। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा करण्यात आला. एकूण 3 हजार 68 प्रकरणे सामंजस्याच्या आधारे निकाली काढण्यात आली, अशी माहिती जिल्हा न्यायाधीश 1 तथा पनवेल तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष जयराज डी. वडणे यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत पनवेल न्यायालयात एकूण 23 हजार 294 प्रकरणे लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती. यामध्ये 18 हजार 939 वादपूर्व प्रकरणे आणि 4 हजार 355 न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता. लोकअदालतीतून झालेल्या समेटामुळे 1 हजार 124 वादपूर्व प्रकरणे आणि 1 हजार 944 प्रलंबित खटल्यांचा तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्यात आला. या प्रक्रियेद्वारे संबंधित पक्षकारांना आणि विविध संस्थांना एकत्रित 6 कोटी 15 लाख 2 हजार 790 रुपयांची तडजोडीची रक्कम मिळवून देण्यात आली.