कपाळावर हात मारण्याची वेळ

आचारसंहितेत 100 कोटींची कामे रखडली; मान्सूनमध्ये विकास चिखलात रुतण्याची भीती

| रायगड | आविष्कार देसाई |

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये जिल्ह्याचा विकास रखडला आहे. या कालावाधीत तब्बल 100 कोटींहून अधिकची विकासकामे थांबली आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहितेचे बालंट दूर झाल्यानंतर कामांना गती येईल असे वाटत होते. मात्र, पावासाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची पुन्हा आचारसंहिता लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीचा 432 कोटींपैकी किती निधी खर्च होणार याबाबत आतापासूनच कपाळाला हात लावण्याची वेळ आली आहे.

रायगड जिल्ह्याचा नियोजन आराखडा हा तब्बल 432 कोटी रुपयांचा आहे. सुरुवातीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या ताकदीनुसार निधीचे वाटप कसे करायचे याचे समीकरण ठरले आहे. त्यानुसार विकासकामांना सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाल्याने विकासकामे झपाट्याने सुरु होती. 16 एप्रिल 2024 रोजी आचारसंहिता लागू झाल्याने विविध विकासकामांना ब्रेक लागला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार तोच कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे एक संपते तोच दुसरी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत. 3164 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पैकी दोन हजार कामे एकट्या जिल्हा परिषदेची आहेत. निविदा प्रसिद्ध करणे, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे यामध्ये वेळ लागतो. आचारसंहितेच्या कालावधीत सुमारे 100 कोटी रुपये खर्चाची 50 टक्के कामे थांबली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास ठप्प झाला आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आचरसंहिता शिथील होणार आहे. परंतु, सध्या पावसाळा असल्याने या कालावधीत कामे करणे शक्य नाही. कार्यारंभ आदेश देऊन सप्टेंबर महिन्यानंतर कामांना गती देणे शक्य आहे. एकूणच, आचारसंहितेनंतर पावसाळ्यात विकास रखडणार हे नाकारता येणार नाही. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता जाहीर होईल, असे गृहीत धरल्यास विकासकामे कधी करणार, असाही मोठा प्रश्‍न आहे.

आचारसंहितेच्या कालावाधीत नियमानुसार विकासकामे करता येत नाहीत. या कालावधीत 50 टक्के कामे थांबली असून, सुमारे 100 कोटी रुपये खर्च करता आले नाहीत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता शिथील होणार आहे. मात्र, पावसाळ्यातही कामे करता येणार नसली, तरी कार्यारंभ आदेश देऊन नंतर विकासकामांना अडथळा येणार नाही.

जयसिंग मेहेत्रे,
जिल्हा नियोजन अधिकारी,
रायगड
Exit mobile version