प्रशासन मूग गिळून गप्प
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कूर्म गतीने
| मुरूड | वार्ताहर |
विहूर जमीन घोटाळा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणार ठरला आहे. याच जागेमधील तिवरांची कत्तल राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार करूनही प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने ग्रामस्थांनीच संघर्षाची तयारी केली. रात्रीची गस्त घालून तिवरांची कत्तल करून ते गाडण्याचे काम करणार्याना विहुर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्य कामगार दोन टेम्पोतून पसार झाले आहेत.
याबाबत विहूर ग्रामस्थांनी तिवरांची कत्तल करणार्या आणि त्यांच्या करवित्या धन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिवसभर होते. उशिरापर्यंत तिवरांची कत्तल करणार्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईबाबत अधिकारी वर्ग चकार शब्द काढण्यास तयार नव्हते, यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
अख्ख्या महाराष्ट्राचा लक्ष वेधून घेणारा विहूर गाव सध्या भूमाफियाबरोबर लढा देत आहे. विहूर येथील शतकापासून गुरचरण असलेली सर्व्हे न.20/1 ही जागा नवाबाच्या नावे चुकीची फेरफार करून नोंद करण्यात आली. नवाबांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांच्या नावे नोंद होऊन त्या वारसांनी प्रथम सन 2003 साली काही भाग विकला व महाराष्ट्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून सरळ सरळ गुन्हा केला. ग्रामस्थांनी त्यावेळी सुध्दा शासनाकडे लेखी तक्रार दिली परंतु, नवाबाच्या आर्थिक बळापुढे प्रशासन झुकले व विरोध संपुष्टात आला. सन 2021 मधे तैजून निसार हसोनजी यांनी बिन आकारी असलेल्या जमिनीचे खोट्या सहीचे अर्ज दाखल करून मोजणी केली, ग्रामस्थांनी सर्व तथ्य मांडूनसुध्दा त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
एवढेच नाही तर ग्रामपंचायतने आता पर्यंत जवळ जवळ 45 तक्रार नोंदवले, प्रशासनाच्या चौकशी कामी आजपर्यंत त्या सर्व तक्रारी घिरट्या घालत आहेत. सहा महिन्यांपासून भूमाफिया जेसीबी व पोकलन मशीनच्या सहाय्याने तिवर झाडांची बेसुमार कत्तल करत आहे; परंतु महसूल व वनविभागाच्या अधिकार्यांनी जाणूनबुजून फोटोसुद्धा घेतले नाही. उलट, लोकांना वेड्यात काढले जात आहे, की इथे तर काहीच दिसत नाही. पोलिसात बेकायदेशीर भराव व रात्रीच्या वेळी होत असलेले तिवड झाडांची कत्तल बाबत वेळोवेळी तक्रारी देऊनसुद्धा आजपर्यंत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परंतु, सोमवारी रात्री गावातील मच्छिमार इसरार पांगारकर हे समुद्रावर गेले असता त्या ठिकाणी त्यांना बेकायदेशीर हालचाली दिसल्या असता त्यांनी लगेच ग्रामस्थांना कळविले. घटनास्थळी गेल्यावर 20 ते 25 जण तिवरांची झाडे कटर मशीनच्या सहाय्याने तोडत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याठिकाणी मुरूड येथील जाहिद कादरी, विहूर येथील सुहेल मोदी, नबील मोदी व अलिखान शिकारी, मुनीम पंगारकर व इतर बॉडीगार्डने ग्रामस्थांना लाठी-दांडक्याचा धाक दाखवून अडवले, तसेच कोणीही पुढे येऊन फोटो काढल्यास ठार करू, अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत ग्रामस्थांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले असता, पोलीस निरीक्षकांनी चौकशी करून कारवाई करणार अशी टाळाटाळ केली. तिवरांची कत्तल करणारे कामगार व संबंधितांना पकडून देऊनसुद्धा फौजदारी कारवाई झाली नाही, याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.







