अपघात टाळण्याकरिता नियमांचे पालन करणे गरजेचे

ठकेदार व महामार्ग विभागाने सूचना फलक लावणे क्रमप्राप्त

| महाड | ग्रामीण प्रतिनिधी |

जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील, रेपोली येथील मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक व कार या दोन वाहनांमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात होऊन दहा जण जागीच मृत्युमुखी पडण्याची दुर्देवी घटना घडली होती. या अपघातामध्ये चार महिलांचा व दोन लहान मुलांचा देखील समावेश होता. या नंतर महामार्ग विभाग व संबधीत ठेकेदार यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून सर्वसामान्य नागरिकांच्या संतापजनक प्रतिकिया उमटल्या. असे असले तरी प्रवास करताना नियमांचे पालन महत्व पूर्ण बनले आहे, तर महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार यांनी ज्या ठिकाणी अपघात सातत्याने होत आहेत त्या ठिकाणी व डिव्हाडर जवळ फलक किंवा रेडियम लावणे गरजेचे बनले आहे.

मुंबई-गोवा (NH-66) राष्ट्रीय महामार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे मोठ्या प्रमाणात चौपदरीकरणाचे काम प्रगती पथावर सुरू आहे, तसेच अशा प्रकारचे अपघात सतत होत असल्याने त्यात वाढ होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाय योजना, याकरिता मुंबई-गोवा महामार्ग संबंधित सर्व भागधारक कंपनींच्या प्रतिनिधींची व सर्व संबंधित विभाग यांनी तातडीने उपाययोजना सुरू करणे गरजेचे बनले आहे.

महामार्गावरील योग्य व महत्त्वाच्या ठिकाणी फलक लावणे, या मध्ये पुढे काम चालू आहे, एकेरी मार्ग, पुढे वळण आहे इ. दिशा परिवर्तकांचा योग्य वेळी वापर करणे, महामार्गावर योग्य ठिकाणी संकेत दर्शक बसविणे, महामार्गावर पटावर्तक व चेतावणी दर्शक दिवे बसविणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सद्य स्थितीत अनेक खासगी वाहनातून प्रवासी वर्ग एका गावातून दुसऱ्या गावात वेगाने जाण्याचा प्रयत्न करत असतात. महामार्ग विभागाने स्पीड लिमिट सह वाहन चालकांना नियमांबाबत मार्गदर्शक प्रणाली अवलंबणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे आरटीओ ने प्रवासी संख्या निश्चित करत ती मोडणाऱ्या वाहनचालकावर कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त बनले आहे.

Exit mobile version