मुरुडकडे पर्यटकांनी फिरवली पाठ

| आगरदांडा | प्रतिनिधी |

दिवाळी सुरू झाली तरी पर्यटकांविना समुद्रकिनारे सुने सुने झाले आहेत. पर्यटक गेले कुठे, असा प्रश्न समुद्राकिनाऱ्यावरील स्टॉलधारकांना पडला आहे.

मुरुड पर्यटनाचे क्षेत्र आहे. याठिकाणी शनिवार व रविवारी पर्यटकांची गर्दी असते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून पर्यटकांनी मुरुडकडे फिरकलेच नाही. आजही तीच परिस्थिती दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्टीतला शनिवार असूनसुद्धा पर्यटक न फिरकल्याने सर्वत्र शांततेचे वातावरण पाहावयास मिळत आहे. शहराजवळील असणारा समुद्र हा निळसर, स्वच्छ असा तीन किलोमीटर लांबीचा एवढा मोठा समुद्राकिनारा लाभला आहे. येथील पांढऱ्या शुभ्र वाळूमुळे दिसणारे स्वच्छ पाणी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत असते. याठिकाणी देश -विदेशातून दरवर्षी दिवाळीनिमित्त लाखो पर्यटक भेट देतात. परंतु, यंदा पर्यटकांनी पाठ फिरवलेली दिसून येत आहे. ना वर्दळ, ना गर्दी, त्यामुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला असून, स्टॉलधारक दिवाळीकरिता येणाऱ्या पर्यटकांच्यां प्रतिक्षेत आहेत.

मुरुड तालुका हॉटेल व लॉजिंग असोसिएशन अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजय पाटील व उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी प्रतिक्रिया देते वेळी म्हणाले, गेले 4 महिने पावसामुळे व्यवसाय पुर्ण ठप्प होता. त्यानंतर तरी पर्यटक सुरु होईल अशी अपेक्षा होती. आता पावसाळा थांबुन दोन महिने होऊन गेले तरी पर्यटक नाही. दिवाळीत तरी पर्यटकांची रेलचेल सुरू होईल पण आजही पर्यटक नाही. यामुळे नोकरदारांना पगार कसा द्यायचा, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. पर्यटक कमी होण्याचा कारण मुख्य रस्ता आहेच त्याबरोबर जागतिक मंदीतीचा फटका आहे, अशी प्रतिक्रिया विजय पाटील यांनी दिली.

दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांकडून महिन्यापूर्वीच लॉजिंग बुकिंग असायची. आता पुढील आठवड्यापर्यंत बुकिंग नाही. अक्षरशः पर्यटकांनी मुरुडकडे पाठ फिरवल्याने आम्ही आर्थिक संकटात पडलो आहे. लाईट बिल, पाणीपट्टी, घरपट्टी व नोकरदारांचा पगार कसा द्यायचा, हा मोठा प्रश्न आहे.

कुणाल सतविडकर, लॉजिंग मालक
रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका
अलिबाग-मुरुड मुख्य रस्त्याला अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटक मुरुडला येणे टाळत आहेत. त्याचा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसत आहे. परिणामी, स्थानिकांचा रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे रस्ता चांगला झाला तर नक्कीच पर्यटक वाढतील, अशी प्रतिक्रिया कुणाल सतविडकर यांनी दिली.
Exit mobile version