। अलिबाग। वार्ताहर ।
कोकणात वर्षा पर्यटनासाठी पर्यटक गर्दी करतात. पावसामध्ये, पाण्यामध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. जून महिन्यातील शेवटच्या आठड्यात कोकणातील सर्व धरणे ओसंडून वाहतात. धबधबे कोसळू लागतात. मुंबईपासून जवळच असलेले अलिबाग-वडखळ रस्त्यावरील तीनविरा धरण ओसंडून वाहण्याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे.
अलिबाग-वडखळ रस्त्यावरुन प्रवास करताना रस्त्याच्या लगतच तीनविरा धरण लागते. पावसाळ्यात हे धरण पूर्ण भरल्यानंतर धरणाच्या भिंतीवरुन वाहणारे पाणी प्रवाशांचे लक्ष वेधून घेते. हे मनमोहक दृश्य पाण्यासाठी मुंबई व अन्य ठिकाणांवरुन येणारे पर्यटक क्षणभर याठिकाणी थांबतात आणि धरणाच्या भिंतीवरुन पडणार्या पाण्यामध्ये मनसोक्त भिजतात. परंतु, जूनअखेर जवळ आला असताना 26 जून उलटून गेली तरी धरणक्षेत्रात कमी पावसामुळे तीनविरा धरण अद्याप भरलेले नाही. त्यामुळे धरण ओसंडून वाहण्यासाठी अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार आहे.