अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

| बिरवाडी | वार्ताहर |

राज्यातील आणि जिल्ह्यातील शहरांमध्ये वाहतूक कोंडी हा प्रश्न कायमच वाहतूकदारांना त्रासदायक ठरत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडी शहरातील बाजारपेठ या नेहमी गजबजलेल्या असतात. ऐन सणावेळी तर लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात या बाजारपेठेमध्ये असते.

बिरवाडी शहरांमध्ये महाराष्ट्र शासनाची बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कार्यरत आहे. आजूबाजूच्या ग्रामीण विभागातील जास्तीत जास्त लोकांचे खाते याच बँकेत आहेत. या बँकेबाहेर कोणत्याही प्रकारची दुचाकी व चारचाकी पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे या बँकेमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक आपली दुचाकी बँकेबाहेर बिरवाडी मेन मार्केट रस्त्यावर अवैध पार्किंग करीत असतो. बिरवाडी व महाड तालुक्याला जोडणारा हा महत्त्वाचा राज्य मार्ग आहे. या विभागामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची एकच शाखा असल्यामुळे अनेक ग्राहकांची खाती याच बँकेत आहेत त्यामुळे दुचाकी घेऊन येणारा ग्राहक आपली पार्किंग रस्त्यावरतीच करतात. त्यामुळे येणार जाणाऱ्या वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस व ग्रामपंचायत विभाग यंत्रणादेखील या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

या रस्त्यावरून बँकेसमोरून जात असताना मोठ्या वाहनांना तारेवरची कसरत असाच प्रवास करावा लागतो. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन कमीत कमी अर्धा ते एक तास वाहतूकदारांना हा त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बँक व्यवस्थापन बँकेबाहेरील अवैध पार्किंग हटविणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच, अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनां विरोधात दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी देखील जनसामान्यातून केली जात आहे.

Exit mobile version