वाहनचालक व नागरिकांची गैरसोय; बाह्यवळण मार्गाला मुहूर्त मिळेना
। पाली/वाघोशी । अमित गायकवाड ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत नववर्षाच्या स्वागतासाठी तसेच पर्यटणासाठी प्रचंड प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. त्यातच मागील अनेक वर्षे येथील बलाप येथून जाणारा बाह्यवळण मार्ग प्रलंबित आहे. परिणामी भाविक, पर्यटक, प्रवासी, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे.
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असल्याने नेहमीच येथे भाविकांची गर्दी असते. पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त येत असतात. पालीतील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर अशा अनेक ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. हि वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी काही नाक्यावर काही वेळेस वाहतूक पोलीस तैनात असूनदेखील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, डबर व खडी वाहतूक करणारे डंपर, एकेरी वाहतुकीवरुन दुहेरी वाहतूक आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैधरित्या पार्क केलेली वाहने यांमुळे पोलीसांना या वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. अनेक वेळा वाहतूककोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशिर होतो. संध्याकाळनंतर बर्याच वेळा वाहतूक पोलीस तैनात नसतात. तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणीही ते नसतात, आणि त्यामुळेसुद्धा बर्याचवेळा कोंडीचा प्रश्न गंभीर बनतो.
बाह्यवळण मार्ग
पाली बाह्यवळण मार्गाला मंजुरी मिळून जवळपास 14 वर्षे झाली आहेत. तरही रस्ता कागदावरच आहे. रस्त्यासाठी 18 कोटी तर भूसंपादनासाठी 10 कोटींची मंजुरी मिळूनही कामाला सुरुवात झालेली नाही. वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548(ए) व पाली पाटणूस राज्यमार्ग 94 ला जोडला जाणारा हा बाह्यवळण मार्ग म्हणजे पाली शहरातील सतत होणार्या वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय आहे. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ हा बाह्यवळण मार्ग काढण्यात येणार आहे. जमीन हस्तांतरित करण्यासाठी काही शेतकर्यांचा विरोध असून त्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण केलेल्या नाहीत.
वाहनांची रेलचेल
मुंबई-गोवा महामार्गाचे संथ गतीने सुरु असलेले अपूर्ण काम यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुंबईवरून कोकणाकडे जाणारे प्रवासी पालीतून विळेमार्ग माणगाववरून किंवा वाकणवरून पुढे जातात. तर कोकणाकडून येणारी वाहने माणगाववरुन विळेमार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. परिणामी पालीत वाहनांची रेलचेल वाढून अधिक वाहतूक कोंडी होते. बाह्यवळण मार्ग निर्माण झाल्यास हि वाहने पालीच्या बाहेरूनच निघून जातील त्यामुळे हि वाहतूक सुरळीत होऊ शकते.
भाविक व पर्यटकांची वाहने पालीमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे रस्त्यावर कोंडी होताना दिसत आहे. पालीतील महाकाली मंदिर चौक, छत्रपती संभाजीमहाराज चौक असे काही महत्त्वाचे रस्ते रुंदीकरण केले आहे. तर ग. बा. वडेर हायस्कूल व बाजारपेठेत आदी ठिकाणचे रस्त्यावर आलेली बांधकामे मागे घेतली आहेत. आणि रस्ते मोकळे केले आहेत. शेतकर्यांना योग्य मोबदला देऊन तसेच सर्व तांत्रिक अडचणी सोडवून बाह्यवळण मार्ग केल्यास पालीतील वाहतूक कोंडी कमी होईल. वाहन चालकांनीदेखील नियमांचे पालन करावे.
– प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्षा, पाली