11 देशांची पायी यात्रा करत तरुण रायगडात
| रायगड | खास प्रतिनिधी |
उत्तर प्रदेशातील चार तरुणांनी 11 देशांमध्ये पायी यात्रा करत तब्बल 4.48 लाख किलोमीटर इतका प्रवास केला. ते आज गुजरातमार्गे पालघर, ठाणे, मुंबई येथून रायगड जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन या यात्रेची माहिती त्यांना दिली. पर्यावरण वाचवण्याचा वसा घेतलेल्या या तरुणांना 5.5 लाख किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. आजपासून पाच दिवस रायगड वासीयांना पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हे ध्येयवादी तरुण पुढील प्रवास करणार आहेत.
भीमकार्यात पडला नाही खंड
2001 पासून उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप, गोविंदा नंद आणि निश्चल मौर्य हे चार तरुण पायपीट करून जगभरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निघाले आहेत. त्यांची टीम आता 20 सदस्यांपर्यंत पोहोचली आहे. ही टीम सध्या महाराष्ट्राच्या विविध भागातून पादाक्रांत करत आहे. 5.5 लाख किलो मीटर पायी चालून लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याचे भीमकार्यात जराही खंड पडू द्यायचे नाही, असा मनोदय केल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात 600 ठिकाणी 14.50 कोटी लावली झाडे
1980 पासून त्यांचे गुरू अवध बिहारी यांनी उत्तर प्रदेशातून सुरू केलेल्या पदयात्रेच्या माध्यमातून या तरुणांनी भारतात 600 ठिकाणी 14.50 कोटी झाडे लावली आहेत. पर्यावरणाचे रक्षण करा, झाडे लावा, पृथ्वी वाचवा, नद्यांचे संरक्षण करा, मुली वाचवा-मुली शिकवा, रस्त्याची सुरक्षा, स्वच्छ भारत मिशन असे त्यांच्या जनजागृतीचा मुख्य उद्देश आहे.
महापुरातून गुरुंना वृक्षाने वाचवले
1980 मध्ये उत्तर प्रदेशात आलेल्या महापुरात त्यांच्या गुरूंना वडाच्या वृक्षाने आधार देऊन वाचवले होते. तेव्हापासून वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रचारार्थ त्यांनी जगभरात पायी यात्रेला सुरुवात केली, त्यांच्या आवाहनाला साद देत हे तरुण ही यात्रा पुढे घेऊन जाणार आहेत. या तरुणांनी 11 देशांचा दौरा केला आहे.