तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव ते इंदापूरच्या दरम्यान तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक उडाली आहे.
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी भागांतील चाकरमानी कोकणात निघाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ही सुरूवात झाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या महामार्गावर वाढली आहे. महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ निर्माण झाली आहे. कोकणात निघालेल्या गणेशभक्तांच्या मार्गात शनिवारी (दि.12) सकाळी वाहतूक कोंडीचे विघ्न निर्माण झाले. साधारणपणे तीन किलो मीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. दहा मिनिटाचे अंतर कापण्यासाठी अर्धा तास लागत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, बेशिस्त वाहन चालक, तसेच माणगाव ते इंदापूर अपूर्ण बाह्यवळण रस्ते यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे बोलण्यात आले आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोवाकडे जाणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी प्राधान्य दिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बेशिस्त वाहनचालकांमुळे प्रवाशांना फटका
मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडाजवळील वाहतूक कोंडी झाली. बेशिस्त वाहनचालकांमुळे दोन वाहने रस्त्यात मधोमध अडकली. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका या मार्गावरील प्रवाशांना बसला.
माणगाव- इंदापूर मार्गावरील साधारणपणे तीन किलो मीटर अंतरावर वाहतूक कोंडी झाली आहे. अरुंद रस्त्यामुळे ही कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे. गोवाकडे जाणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिले आहे. महामार्गावर मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
– सचिन पवार, पोलीस निरीक्षक,
जिल्हा वाहतूक शाखा, रायगड
