अलिबाग-बेलकडे मार्गावरचा प्रवास नकोसा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा मंडळ अर्थात एमएसआयडीसीमार्फत अलिबाग ते सहाण बायपासपर्यंत काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. पंधरा ते वीस मिनीटाचे अंतर कापण्यासाठी एक तास लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. तासनतास कुरुळपासून बेलकडे, सहाण बायपास रस्त्यावर वाहने उभी राहत आहे. ठेकेदारांच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. अलिबाग-बेलकडे मार्गावरचा प्रवास नकोसा झाला आहे.
विकासाच्या नावाखाली अलिबाग बायपास मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्यात आली. रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी जेसीबीच्या माध्यामतून खोदकाम करण्यात आले आहे. परंतु, या कामांत योग्य नियोजन नसल्याने धुळ खात प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालयासह नोकरी व्यवसायानिमित्त अलिबाग व रोहाकडे जाणारे विद्यार्थी, कामगारांना तासानसात वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ आली आहे. रुग्णांना घेऊन रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकेलादेखील या वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत आहे. या मार्गावर काही ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे माती, खडीतून वाहन चालविताना अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. ठेकेदारांकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याची प्रतिक्रिया प्रवासी वर्गाकडून उमटत आहे.
