। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोल्हारे साई मंदिर ते धामोते यादरम्यान सुरु असलेले काँक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे रस्ता एक तास पाऊस झाला की पाण्यात जात असून, अर्धवट काम झालेल्या रस्त्याची एक बाजू पाण्याखाली राहात असल्याने वाहनचालक यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. दरम्यान, रस्त्यावरून वाहने धोका पत्करून प्रवास करीत असून, त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला काहीही सोयरसुतक नसल्याने वाहनचालक संतप्त आहेत.
माथेरान- नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर कोल्हारे साई मंदिर पासून धामोते गावापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीचा बनविण्यात येत आहे. डिसेंबर 2021 मध्ये या रस्त्याचे काम सुरु झाले आणि अद्याप पूर्ण झाले नाही. त्यात पावसाळा लक्षात घेता 900 मीटर लांबीचा रस्ता वेळेत पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, ठेकेदाराने त्या रस्त्यावरील दोन लेनपैकी एका लेनचे काम पूर्ण केले आहे, तर दुसरी लेनचे काम अर्धवट ठेवले आहे. त्यात त्या ठिकाणी रस्ता एका लेनला किमान सव्वा फूट खाली राहिला आहे. त्यावेळी ठेकेदाराने संबंधित रस्त्यावरील खोलगट भागाची माहिती देण्यासाठी बॅरिकेट्स किंवा रिबीन लावून वाहनचालक यांना माहिती देण्याची गरज आहे. मात्र, गेली दोन महिने तशाच पद्धतीने रस्ता ठेवण्यात आला असून, वाहनाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही.
सध्या हा रस्ता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्त्याच्या एका बाजूला सव्वा ते दीड फूट पाणी आणि दुसर्या बाजूने जाणारी वाहने अशी स्थिती असून, कधीही वाहने खाली कोसळून अपघात होऊ शकतो. दुसरीकडे सध्या एकाच लेनवरून दोन्ही बाजूला जाणारी वाहने यांचा प्रवास सुरु आहे, त्यामुळे वाहने कोसळण्याची शक्यता वाढली आहे.
या रस्त्यात दररोज एक मोठे वाहन अडकून पडत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी ही दररोजची समस्या बनली आहे आणि असे असतानादेखील सार्वजनिक बांधकाम खाते त्या भागात दगड खडी टाकून रस्ता किमान चालण्यासाठी करीत नाही, याबद्दल देखील संताप व्यक्त होत आहे.