झाडाची फांदी वाहतुकीस अडथळा

अपघात होण्याची भीती

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडेनजीक रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या एका झाडाची फांदी तुटलेल्या अवस्थेत आहे. फांदी रस्त्यावरच लटकत असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी ती अडथळा ठरत असून, अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून, निद्रावस्थेत असल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांमधून उमटत आहे.

अलिबाग व रोहा या दोन तालुक्यांत औद्योगिकीकरणाचा विस्तार होत असल्याने या मार्गावरून वाहनांची वर्दळदेखील वाढली आहे. नोकरी, व्यवसायाबरोबरच शिक्षणासाठी या मार्गावरून कामगार, विद्यार्थ्यांची ये-जा सतत सुरू असते. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांपैकी काही जुनी असून, त्यांचा पसारा वाढला आहे. सोमवारी या मार्गावरील बेलकडेनजीक रस्त्याच्या दुतर्फा असलेली भल्या मोठ्या झाडाची फांदी तुटून मुख्य रस्त्यावर लटकली आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी ही फांदी डोकेदुखी बनत आहे. ही फांदी वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास होत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही फांदी काढण्याबाबत कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने त्याचा त्रास प्रवाशांसह चालकांना होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारभारामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version