वाहतूक दोन तास खोळंबली
| रसायनी | प्रतिनिधी |
जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वावंढळ गावच्या हद्दीत असलेल्या वावंढळवाडी पुलाजवळ सोमवार, दि.26 रोजी एक भलेमोठे आंब्याचे झाड पडून खोपोली-पनवेल आणि पनवेल-खोपोली या दोन्ही दिशांच्या मार्गावर तीन-तीन किमी लांबीच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती.
दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास पनवेल-खोपोली रस्त्यावर वावंढळ वाडी पुलाजवळ एक आंब्याचे झाड पडून दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती. हे झाड पडत असताना एक एस.टी. गाडी एखाद क्षण अगोदर निघून गेली होती, दैव बलवत्तर म्हणून ती वाचली, त्याच एसटी गाडीच्या मागे पुलावर वावंढळ गावचे विलास कदम हे वावंढळ येथे आपल्या घरी येत असताना त्यांना झाड पडलेले दिसले, त्यांनी तात्काळ स्थानिक पत्रकार अर्जुन कदम यांना संपर्क केला. पत्रकार अर्जुन कदम यांनी आय. आर. बी. चौक पोलीस, अपघातग्रस्त यांना मदत करणारे रामदास काईनकर यांच्या संपर्क साधून व्हॉट्सॲप ग्रुपवर माहिती दिली. बघता बघता दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे पोलीस, ट्रॅफिक पोलिस यांना येण्यास अडथळा निर्माण झाला, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रामदास काईनकर यांनी त्यांच्या मालकीची जेसीबी बोलावली, आणि झाडाच्या फांद्या तोडण्यास सुरुवात केली. पावसाची रिप रिप सुरू होती.यावेळी ट्रॅफिक पोलीस व चौकचे पोलीस यांनी सरपंच सुहास कदम, दिनेश महाडिक, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कदम, ग्राम महसूल अधिकारी उदय देशमुख, कोतवाल मंगेश डुकरे व अन्य कार्यकर्त्यांनी ट्रॅफिक रोखून धरण्यास मदत केली,आणि तोडलेल्या फांद्या बाजूला केल्या, दरम्यान झाड कटर यालादेखील मदतीला बोलावन्यात आले होते.