| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. माणगाव शहरातून वाहणाऱ्या काळ नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, नदीकाठच्या लोकांना व जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
तालुक्यात गेले दोन दिवस रात्रंदिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे बाजारपेठ ओस पडत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे माणगाव शहरातून वाहणाऱ्या काळनदीच्या पाण्याची पातळी हळूहळू वाढत असून, शहरात चोहोबाजूनी पाणीच पाणी दिसत आहे. या मुसळधार पावसामूळे तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचा माणगाव शहराकडे येण्याचा संपर्क तुटला आहे. हा मुसळधार पाऊस असाच आणखीन दोन दिवस पुढे सुरु राहिल्यास काळनदी धोक्याची पातळी ओलांडेल असे वाटत असल्याने नदी काठच्या लोकांना व जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.