सीताची वेणीची अनेकांना अनुभूती
| पनवेल | राजेश डांगळे |
फुले म्हटली की आपल्याला उत्तराखंड येथील व्हॅली फॉर फ्लॉवर्स किंवा महाराष्ट्रातले कास पठार लगेच आठवते. असंख्य फुले फुलणारी ही दोन ठिकाणे पावसाळा संपल्यावर फुलतात एवढेच आपल्याला माहिती आहे. परंतु, पावसाळ्याची सूचना देणारी म्हणजेच पोस्टमन असणाऱ्या अनेक फुलांच्या जाती आहेत ज्याकडे आपले दुर्लक्ष झालेले आहे.
पनवेल येथील अनुभूती ग्रुपने एक वाईल्ड फ्लॉवर्स ट्रेल आयोजित करून सामान्य नागरिकांना निसर्गवाचन कसे करायचे याची जणू कार्यशाळाच छोटेखानी कार्यक्रमातून घेतली. आपल्याकडे प्रत्येक ऋतू बदलताना ज्या खूणा निसर्ग दाखवत असतो, त्या कशा ओळखायच्या याबद्दलसुध्दा ‘अनुभूती 365 डेज’चे सुदीप आठवले यांनी सविस्तर सांगितली.
या कार्यक्रमात वाघेरी (ब्रिटल ऑर्चिड) तसेच सीतेची वेणी अथवा गजरा (फॉक्स टेल ऑर्चिड) या दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींबद्दल माहिती देत असताना इतर नेहमी दिसणाऱ्या; परंतु दुर्लक्षित अशा शेवळे, कावके, जंगली मोगरा, लाजाळू, सुवर्ण क्षीर, धामण अशी अनेकविध फुले आणि वनस्पतींबद्दल आठवले यांनी माहिती दिली. रविवारची सकाळ असूनसुद्धा 25-30 निसर्गप्रेमींनी या संधीचा फायदा घेतला. अनुभूती 365 ही संस्था पर्यावरण जनजागृती, रक्षण आणि शिक्षण या क्षेत्रात कार्यरत असून, सामान्य लोकांना निसर्गाकडे घेऊन जाऊन त्यांना निसर्गाचे महत्त्व समजावणे आणि याच सामान्य नागरिकांना पर्यावरण रक्षण का गरजेचे आहे. हे अशा अनुभवांमधून उलगडून सांगणे हे संस्थेच कर्तव्य आहे, असे अनुभूती 365 डेच्या रुपाली पाटील यांनी नमूद केले.