महामार्गावर अंधारात पुन्हा एकदा वृक्षतोड
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
जाहिरात फलकांना अडथळा ठरत असलेल्या वृक्षाची तोड करण्यात आल्याचा प्रकार सायन-पनवेल महामार्गावर घडला आहे. नेहमीप्रमाणे रात्रीच्या अंधारात ही तोड करण्यात आल्याने कोण्या अज्ञात व्यक्तीने फलकांना अडथळा ठरणारे हे वृक्ष छाटून अप्रत्यक्षपणे जाहिरात फलक कंपनीला मदत केलेली असण्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेल पालिका हद्दीतील विविध महामार्गांलगत असलेल्या वृक्षांवर विष प्रयोग करण्यासोबत रात्रीच्या अंधारात इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने वृक्षतोड करण्याचे प्रकार घडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत ज्या परिसरातील वृक्षांवर बेकायदेशीररित्या कुऱ्हाड चालवली जाते, त्या परिसरात नेहमीच कुठल्या न कुठल्या जाहिरात कंपन्यांचे अवाढव्य फलक लावण्यात आल्याचे व तोडण्यात आलेले वृक्ष अशा जाहिरात फलकांना अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात करण्यात येणारी ही वृक्षतोड नक्की कोणाच्या पथ्यावर पडते, असा सवाला उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, परिसरातील शीख समाजाच्या वतीने सायन-पनवेल महामार्गालगत वड आणि पिंपळाच्या झाडांची लागवड आणि संगोपन करण्यात आले आहे. शीख समाजाने मोठ्या परिश्रमाने वाढवलेले हे वृक्ष छाटण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.