चरीच्या संपाचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणादायी – कैलास पिंगळे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पीएनपी महाविद्यालयाने केला चरी संपाचा जागर
पी.एन.पी.महाविद्यालयाचे चरीमध्ये वृक्षारोपण

। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारत सरकारच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. रायगड जिल्ह्यात देखील घरोघरी तिरंगा, सागर स्वच्छता ऐतिहासिक स्थळांचे जतन, संगोपन असे विविध अभियान राबवले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर झेंडा या कार्यक्रमाअंतर्गत प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वेश्‍वी अलिबाग यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ऐतिहासिक वारसा असलेल्या चरी ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण, प्रभात फेरी व जनजागृती तसेच इतिहासात प्रदीर्घ काळ चालणार्‍या चरी गावच्या संपाबद्दल मार्गदर्शन सत्र अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळच्या सत्रात प्रभातफेरीचे आयोजन व जनजागृती मोहीम चरी गावामध्ये राबवण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कैलास पिंगळे, सरपंच निलम पाटील, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कार्यक्रमाधिकारी प्रा. रविंद्र पाटील व प्रा. पल्लवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांतर्फे स्मारकाभोवती स्वच्छतेचे श्रमदान करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते चरी गावातील संपाच्या स्मारकाभोवती वृक्षारोपण करण्यात येऊन सुशोभीकरण करण्यात आले.

यानंतर सर्व विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र जमून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे व्याख्याते कैलास पिंगळे यांनी विद्यार्थ्यांना चरीचा संप : इतिहास व वारसा या विषयावर व्याख्यान देऊन चरी या गावची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी सांगितली आणि ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना प्रेरित केले. लवकरच कैलास पिंगळे यांचे चरीच्या संपावर अभ्यासपूर्ण पुस्तक येत असल्याने अतिशय अभ्यासपूर्ण माहितीचे सादरीकरण त्यांनी यावेळी केले.

या व्याख्यानासाठी ग्रुप ग्रामपंचायत चरी गावच्या सरपंच निलीमा पाटील, उपसरपंच अभय पाटील, महेंद्र ठाकूर,चरी गावचे गोरख पाटील तसेच विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. श्री महेंद्र ठाकूर यांनी आपल्या वक्तव्यात चरी संपाची थोडक्यात भूमिका स्पष्ट करून गावातील महाविद्यालयाच्या स्वच्छता व श्रमदानाबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व पीएनपी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ओमकार पोटे यांनी शासनाच्या अमृत महोत्सवाचे महत्त्व पटवून देत ऐतिहासिक वारसा म्हणून चरी गावची केलेली निवड सार्थ ठरली याबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रसिका म्हात्रे यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी पाटील यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कला विभाग प्रमुख प्रा नम्रता पाटील, प्रा तेजेश म्हात्रे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांबरोबरच उत्स्फूर्तपणे प्रा. प्रिती पाटील, प्रा. योगिता पाटील, प्रा. तन्मय पाटील या शिक्षकांचे योगदान लाभले.


Exit mobile version