| अलिबाग | प्रतिनिधी |
गाव तिथे रस्ता झालाच पाहिजे, रेशन दुकानात धान्य पाहिजे पैसे नको, आदिवासी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत अलिबागमध्ये आदिवासी समाजाने सरकारविरोधात मोर्चा काढला. या मोर्चाला महिलांसह, पुरुष तरुण, तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे संपुर्ण अलिबाग आदिवासी समाजाने बहरून गेला होता. निमित्त होते, जागतिक आदिवासी व क्रांती दिनाचे. यावेळी मुकेश नाईक, कृष्णा पिंगळा धर्मा पिंगळा, भगवान नाईक, धर्मा लोभी आदींसह शेकडो आदीवासी समाज उपस्थित होते.

जागतिक आदिवासी दिनाबरोबरच क्रांतीदिनाचे औचित्य साधून ही रॅली काढण्यात आली. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर तेथून रॅलीला सुरुवात केली. शिस्तबध्द पध्दतीने घोषणा देत आदिवासी समाज त्यांच्या न्याय हक्काची जाणीव शासनाला करून देत होते. खालापूर येथील चौकमधील ईशाळवाडीमधील बांधवांचे स्थलांतरत करून त्यांना चांगली घरे बांधून द्यावी. मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. समान नागरी कायद्यामुळे आदीवासी समाजाला मिळणाऱ्या सुविधा बंद होणार आहेत. त्यात आदीवासी समाज भरडला जाण्याची भिती आहे. त्यामुळे समान नागरी कायदा रद्द करा.

वन हक्क कायद्यांतर्गत येणारा दावे तात्काळ मंजूर करा. जात पडताळणी कार्यालय रायगड जिल्ह्यात सुरु करावा. आदिवासीवाड्यांकडे जाणारा रस्ता तयार करा. आदिवासी वाड्यांना गावठाण जागेचा दर्जा मिळावा. त्याठिकाणी रस्ते, पाणी, विद्यूत सुविधा मिळाव्यात. 81 आदिवासी वाड्यातील अतिदरड प्रवण क्षेत्रात सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच पुनर्वसन करण्यात आले. अशा अनेक प्रकारच्या मागण्यांसाठी आदीवासी समाजाने मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एसटी स्थानक, बालाजी नाका, कर्वे रोड व जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत ही रॅली काढण्यात आली.