200 ते 250 रु.शेकडा प्रमाणे विक्री
| तळा | प्रतिनिधी |
तळा बाजारपेठेत ओले काजूगर विक्रीसाठी दाखल झाले असून जवळपास 200 ते 250 रुपयांपर्यंत शेकडा भावाने या कजुगरांची विक्री करण्यात येत आहे. तालुक्यातील आदिवासी समाज हा जंगलातील रानमेवा विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. फेब्रुवारी ते मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत तालुक्यातील आदिवासी बांधव काजूगर, आंबे, फणस, करवंद, जांभूळ आदी रानमेवा विकून मिळालेल्या पैशांवर आपला उदरनिर्वाह करतात. तळा बाजारपेठेत सध्या काजूगरला मोठी मागणी असून यावर्षी ग्राहक 200 ते 250 रु. शेकड्याने काजूगर खरेदी करताना दिसत आहेत. आदिवासी बांधव दिवसभर उंच काटीच्या (आकोटी) सहाय्याने जंगलात ओल्या बिया काढून सायंकाळी घरी घेऊन येतात. दोन दिवस बियांची साठवणूक केल्यावर या बियांमधून अखंड गर काढण्यासाठी मोठी मेहनत घेतात. त्यानंतर या बिया बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. तळा बाजारपेठेत या ओल्या काजुगरांना मोठी मागणी असल्याने अवघ्या काही तासातच या बिया विकल्या जातात. हे काजूगर जवळपास पाऊस सुरू होईपर्यंत मिळत असल्याने गोरगरीब आदिवासी बांधवांच्या हाताला काम व पोटाची खळगी भरण्यास आधार मिळतो.







