रामराज ग्रामपंचायतीतील आदिवासी बांधवांची व्यथा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रामराज ग्रामपंचायत परिसरातील आदिवासी बांधवांना आजही रेशनसारख्या मूलभूत गरजेसाठी मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. पिंपळवाडी, नवघर, खैरवाडी, जांभूळवाडी तसेच परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांमधील आदिवासी नागरिकांना रेशनसाठी पाच ते सहा किलोमीटर अंतर कापत रामराजपर्यंत यावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रामराज ग्रामपंचायत क्षेत्रफळाने मोठी असून वाड्या-वस्त्या दूरदूर पसरलेल्या आहेत. खराब रस्ते, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि प्रवासी सुविधांचा अभाव यामुळे हा प्रवास अनेकांसाठी कठीण ठरतो. विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह रेशनसाठी येताना आदिवासी बांधवांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होत असल्याने हा त्रास आणखी वाढतो.
अनेक आदिवासी कुटुंबांसाठी रेशन मिळवणे म्हणजे केवळ अन्नधान्याचा प्रश्न नाही तर तो त्यांच्या दैनंदिन जगण्याचा संघर्ष बनला आहे. कामावर जाण्याची वेळ, मुलांच्या शाळा आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत एवढा लांब प्रवास करणे त्यांच्या क्षमतेबाहेरचे ठरत आहे.
या विषयाबाबत यापूर्वीही आदिवासी बांधवांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र आजपर्यंत त्यांचा प्रश्न प्रलंबितच आहे. परिणामी, बोरघर ग्रामपंचायतीप्रमाणे रामराज ग्रामपंचायतील नागरिकांनाही रेशनची सोय अधिक जवळ उपलब्ध व्हावी, अशी ठाम मागणी होत आहे. महान, महानवाडी आणि उमटे डेपो ही ठिकाणे मध्यवर्ती असल्याने तेथे रेशनची सोय उपलब्ध झाल्यास आदिवासी कुटुंबांचा मोठा प्रश्न सुटू शकतो.
जवळच रेशन मिळावे, ही केवळ सोयीची बाब नसून आदिवासी बांधवांचा मूलभूत हक्क आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शासनाच्या विविध योजनांची घोषणा होते, मात्र त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत का, असा सवाल रामराज परिसरात उपस्थित होत आहे.
रामराज ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांचा हा त्रास आणि मागणी शासनाने गांभीर्याने लक्षात घ्यावी आणि तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.





