क्षुल्लक वादातून बारा वर्षीय मुलीची आत्महत्या

| पनवेल | प्रतिनिधी |

शाळेतील गॅदरिंगचा कार्यक्रम पाहण्यासाठी लहान भावाने टीव्हीचा रिमोट न दिल्यामुळे झालेल्या वादातून 12 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मन हेलावणारी घटना पनवेल येथील आसुडगांव परिसरात घडली. माही उर्फ अंजली ओमप्रकाश गुप्ता (12) असे या मृत मुलीचे नाव आहे.

आसुडगाव, सेक्टर-5 मध्ये राहणारी माही गुप्ता तिच्या आई-वडील आणि लहान भावासह राहात होती. माहीला टीव्हीवर तिच्या शाळेचा गॅदरिंगचा कार्यक्रम पाहायचा होता. त्यासाठी तिने लहान भावाकडे टीव्हीचा रिमोट मागितला. मात्र, लहान भावाला दुसरा कार्यक्रम पाहायचा असल्याने त्याने तिला रिमोट देण्यास स्पष्ट नकार दिला. या क्षुल्लक कारणावरुन बहीण-भावामध्ये जोरदार वाद झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या माहीने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले. ती तात्काळ घरातील दुसऱ्या मजल्यावर गेली आणि तेथील छताच्या पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर माहीची आई तिला पाहण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली असता, तिला माही गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. या हृदयद्रावक प्रकारानंतर माहीच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तात्काळ पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहीला दाखलपूर्व मृत घोषित केले. खांदेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, अवघ्या 12 वर्षांच्या मुलीने रागाच्या भरात इतके मोठे पाऊल उचलल्याने आसुडगाव परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version