अंधेरीत इमारतीला आग; दोघांचा मृत्यू

fire isolated over black background

| मुंबई | प्रतिनिधी |

अंधेरी पूर्व परिसरातील साकीविहार रोडवर असलेल्या एका व्यावसायिक इमारतीला बुधवारी (दि.7) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत धुरामुळे गुदमरून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे लाखो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

साकीविहार रोडवरील नारायण प्लाझा या चार मजली इमारतीला बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास आग लागली. या कार्यालयातील फर्निचर आणि ज्वलनशील वस्तूंमुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण मजल्यावर दाट धूर पसरला होता. याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले. अग्निशमन दलाने तातडीने इमारत रिकामी करत बचाव कार्य चालू केले. यादरम्यान कार्यालयात दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. भगवान पिटले (30)आणि सुमंत जाधव (28) अशी मृताची नावे असून दाट धुरामुळे श्वास गुदमरल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या आगीत कार्यालयातील इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी फर्निचर, फॉल्स सीलिंग, लिथियम-आयन बॅटरी आणि महत्त्वाच्या फाईल्स जळून खाक झाल्या. प्राथमिक अंदाजानुसार आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे मानले जात आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version