शासकीय दाखल्यांसाठी दोन कार्यालयांचा फेरा

पालकांसह विद्यार्थ्यांची धावपळ

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात सध्या शालेय, महाविद्यालय कामासाठी विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांची आवश्यकता आहे. मात्र, तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय भवनमध्ये, तर शासकीय दाखल्यांसाठी आवश्यक असलेले मुद्रांक हे जुन्या कार्यालयाबाहेर मिळत आहे. दरम्यान, शासकीय दाखल्यांसाठी धावपळ करणार्‍या पालकांना कर्जत शहरात दोन कार्यालयांचा फेरा मारावा लागत आहे.


कर्जत तहसील कार्यालय ब्रिटिश काळापासून टेकडीवर होते. मात्र, मागील महिन्यात कर्जत शहरातील पोलीस मैदान परिसरात बांधण्यात आलेल्या प्रशासकीय भवन येथे हलविण्यात आले आहे. त्या कार्यालयात सर्व कार्यालयांचे स्थलांतर करण्यात आले असून, कर्जत तहसील कार्यालय ज्या प्रशासकीय भवन येथे आहे. त्या ठिकाणी सेतू कार्यालयदेखील सुरू झाले असून, तेथील शासकीय कामे केली जात आहेत. सध्या दहावी आणि बारावीचे निकाल लागले असून, विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे गरज आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्व पालक आपल्या पाल्यांना घेऊन कर्जत तहसील कार्यालय येथे येत आहेत. मात्र, शासकीय दाखल्यांसाठी लागणारे मुद्रांक पेपर हे तहसील कार्यालय असलेल्या प्रशासकीय भवन येथे मिळत नाहीत. त्यामुळे मुद्रांक पेपर मिळविण्यासाठी तसेच त्यावर मजकूर टाईप करुन घेण्यासाठी पालकांना चालत-चालत 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जुन्या तहसील कार्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे एखाद्या कामासाठी जे तीन तास लागत होते, त्या एका दाखल्याच्या कामासाठी दिवस जात आहे. कर्जत तहसील कार्यालय नवीन ठिकाणी आणि अर्ज टाईप करण्याची कामे जुन्या कार्यालयाबाहेर आहेत. त्यामुळे पालक वर्गात प्रचंड संताप असून, कर्जत तहसील कार्यालयाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.


नवीन प्रशासकीय भवन येथे जुने तहसील कार्यालय हलविण्यात आले असून, त्यावेळी शासनाच्या मुद्रांक विभागाचे मुद्रांक शुल्क विक्रेते यांची दुकाने हलविण्यात आली नाहीत. मुद्रांक शुल्क हे विकण्याचा परवाना शासनाच्या विभागाने दिला असून, रायगड जिल्ह्याचे मुद्रांक शुल्क अधिकारी यांचे कार्यालयदेखील जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. असे असताना कर्जत येथे मुद्रांक विकणारे यांना नवीन प्रशासकीय भवनमध्ये जागा देण्यात आली नाही. मुद्रांक पेपरची प्रत्येक शासकीय कामासाठी आवश्यकता भासत असते. त्यात कर्जत तहसील कार्यालयात विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची गर्दी आहे.शाळा आणि महाविद्यालय प्रवेश घेण्यासाठी शासकीय दाखले महत्त्वाचे असून, ते दाखले घेण्यासाठी पालक कर्जत तहसील कार्यालयात पोहोचत आहेत. मात्र, त्यांना प्रशासकीय भवनमधील सेतू कार्यालयात केवळ दाखल्यांचे अर्ज मिळतात. मात्र, त्या अर्जासोबत लावावे लागणारे मुद्रांक पेपर हे कर्जत तहसील कार्यालयात उपलब्ध होत नाही.

ते मुद्रांक खरेदी करण्यासाठी जुन्या तहसील कार्यालयात म्हणजे टेकडीवरील कार्यालयात जावे लागत आहे. ही सर्व कामे करण्यासाठी पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड रिक्षा प्रवासासाठी लागत आहे. त्यामुळे पालक वर्गात संतापची भावना असून, रायगड जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी मनसेच्या कर्जत शहर महिला अध्यक्ष वैशाली कांबळे यांनी केली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी मुद्रांक शुल्क विभागाला नवीन प्रशासकीय भवन मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी आणि पालकांची धावपळ थांबवावी, अशी मागणी केली आहे. शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पालकवर्गातून मोठे आंदोलन उभे राहू शकते, कारण तालुक्याच्या शेवटच्या टोकावरून पालक आपल्या पाल्याचे शासकीय दाखले मिळविण्यासाठी येत असतात. त्यांना दाखले मिळत नसल्याने पालकवर्ग संतप्त असल्याची माहिती वैशाली कांबळे यांच्याकडून देण्यात आली आहे.

मुद्रांक शुल्क विक्रेते यांनी आपली कार्यालय तहसील कार्यालयाच्या बाहेर सुरू करावीत.प्रशासकीय भवनाच्या आवारात कोणत्याही प्रकारचे कार्यालय दिले जाणार नाही. पण, समोर असलेल्या मोकळ्या जागेत कार्यालय उभे करण्यास आम्ही विरोध केलेला नाही.

डॉ शीतल रसाळ,
तहसीलदार
Exit mobile version