। खोपोली । वार्ताहर ।
खालापूर तालुका, खोपोली शहर, चौक विभाग येथील “आपले सरकार” या योजनेतून विविध दाखले देणारी जी बहुतांशी केंद्रे मंजूर केली आहेत ती बंद असल्याने नागरिकांची होलपट सुरू आहे. त्यात शाळा मेआणि कॉलेज नव्याने सुरू झाल्याने विवीध दाखल्यांसाठी धावपळ करुन सर्व जण हवालदिल झाले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या महसूल प्रशासनाच्या कार्यालयात मिळणारे दाखले आणि विविध संदर्भ नागरिकांना सहजासहजी उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून “आपले सेवा केंद्र “आणि “आपले सरकार” अशा योजनांच्या माध्यमातून विविध ठिकाणी केंद्रांची निर्मिती केली गेली होती. खालापूर तालुका, खोपोली शहर, चौक विभाग अशा ठिकाणीही या केंद्राचे निर्माण झाले होते. असे असताना या केंद्रातील बहुतांशी केंद्रे बंद असून त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, पालक वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांना शासकीय दाखल्यांसाठी खूप धावपळ करावी लागते.
याबाबतीत रायगड जिल्हा महसूल प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने त्वरित दखल घेऊन या गैरप्रकाराला आळा बसवावा अशी मागणी होत आहे. अन्यथा महाराष्ट्र शासनाने नागरिकांची गैरसोय थांबावी म्हणून अशा योजनांचे निर्माण केली असून देखील त्यामध्ये होणाऱ्या मनमानीमुळे दाद कोणाकडे मागायची असा सवाल निर्माण होईल. कार्यरत नसलेल्या केंद्रांची मान्यता रद्द करून नवीन केंद्रांना मंजुरी देणे योग्य ठरेल.