| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
कळंबोली वसाहतीतील सेक्टर 11 परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली. हेरंब सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळ सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामस्थळी उभारण्यात आलेले उंच संरक्षण पत्रे आणि तात्पुरते कंपाउंड जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने कोसळल्याने अनेक दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामस्थळी उभारण्यात आलेले संरक्षण पत्रे आणि तात्पुरते कंपाउंड वाऱ्याच्या वेगामुळे कोसळून शेजारील हेरंब सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संरक्षक भिंतीवर आदळले. या धडकेमुळे संरक्षक भिंतही कोसळली. भिंतीलगत उभ्या असलेल्या अनेक दुचाकी त्याखाली दबल्या गेल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कोसळलेले पत्रे व अवशेष बाजूला करून अडकलेल्या दुचाकी बाहेर काढण्याचे काम केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, माजी नगरसेविका विद्या गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त नागरिकांची विचारपूस केली. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने नुकसान झालेल्या वाहनांची तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या घटनेमुळे बांधकाम स्थळांवरील सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते संरक्षण पत्रे, कंपाउंड आणि इतर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात प्रशासन आणि संबंधित विकसक कोणती भूमिका घेतात, तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना कितपत दिलासा मिळतो, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







