पनवेल-नेरुळ मधून ‘पी.एफ.आय’ चे दोन कार्यकर्ते जेरबंद

| पनवेल | वार्ताहर |

देशविघातक कृत्यांना मदत करण्याच्या आरोपावरुन ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा’ने गेल्या आठवड्यापासून पी.एफ.आय या संघटनेच्या देशभारतील कार्यालयांवर धाडी टाकून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी देखील पनवेल आणि नेरुळ मधून ‘पी.एफ.आय’ च्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयावर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी नेरुळ, सेक्टर- २३ दारावे गावातील ‘पी.एफ.आय’च्या कार्यालयात देखील धाड टाकण्यात आली होती. सदर कारवाईवेळी ‘एन.आय.ए’च्या पथकाने ‘पी.एफ.आय’चा अध्यक्ष आसिफ शेख याची तब्बल ७ तास चौकशी करुन त्याला सोडून दिले होते. ‘एन.आय.ए’च्या पथकाने पनवेल येथील कार्यलयावर देखील धाड टाकून एकाला ताब्यात घेतले होते.

सदर कारवाई दरम्यान ‘एन.आय.ए’च्या पथकाने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, भित्ती पत्रके आणि फलक जप्त केले होते. त्यानंतर एन.आर.आय पोलिसांनी नेरुळ, सेक्टर- ५० मधून अब्दुल रेहमान अब्दुल रौफ शेख (३८) या कार्यकर्त्याला अटक केली. तर पनवेल शहर पोलिसांनी बावन्न बंगला परिसरात राहणाऱ्या अब्दुल रहीम याकुब सय्यद (४६) याला अटक केली आहे. सदर दोघांवर सी.आर.पी.सी (१५१) ३ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version