| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई-गोवंडी येथील तिघे तरुण कर्जत तालुक्यातील पाली भूतीवली येथे पर्यटनासाठी आले होते. हे दोन्ही तरुण सकाळच्या सुमारास धरणाच्या पाण्यात अंघोळी करीत असताना बुडाले. तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या पाण्यात बुडाल्याची माहिती समारे येत आहे. त्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक आदिवासी तरुणांना यश आले आहे.
मुंबई-गोवंडी येथील तिघे तरुण कर्जत तालुक्यातील पाली भूतीवलीतील लघुपाटबंधारे प्रकल्प येथे पर्यटनासाठी आले होते. हिटवेष खांडू, इब्राहिम खान आणि खालिद शेख अशी या तरुणांची नावे आहेत. त्या तिन तरुणांपैकी दोन तरुण अंघोळीसाठी धरणात उतरले. तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या पाण्यात बुडाले. स्थानिक आदिवासींनी पोलीस पाटील आणि नेरळ पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने पाण्यात बुडालेले तरुण खालिद शेख आणि इब्राहिम खान यांना साधारण 20 फूट खोल पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोन्ही तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. नेरळ पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक भास्कर गच्चे यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविले आहेत. तत्पुर्वी याच महिन्यात पाषाणे येथील धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, धरण परिसरात प्रवेश निषिद्ध असताना देखील पर्यटक येत असल्याने धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.