उमेदच्या महिलांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

“उमेद” च्या महिलांनी जागविली पूरग्रस्तांची जगण्याची अन् लढण्याची “उमेद”

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्ह्यातील महाड पोलादपूर मध्ये दि.22 जुलै रोजी झालेल्या महापूरात महाड पोलादपूरवासियांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरात चिखल साचला, अन्नधान्य वाहून गेले तर काही ठिकाणी भिजून खराब झाले.
या सर्व परिस्थितीत आपल्या भगिनींसोबत उभे राहून त्यांना मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करण्याची उमेद, उमेद अभियानातील महिलांनी दाखविली आहे. याच महिलांनी पूरग्रस्तांच्या मनात जगण्याची अन् लढण्याची उमेद जागविली आहे.
जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेदच्या जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून अनेक स्वयंसहायता समूहामधील महिला सदस्यांनी मदत एकत्रित केली.यामध्ये तांदूळ,गहू, नाचणी, तेल, मसाला, हळद, मीठ, खाद्यपदार्थ, पीठे आदी वाण सामानासहीत नवीन व काही जुने कपडे, साड्या, टाॅवेल, साबण, फिनेल, सॅनेटरी नॅपकीन, पाणी बाॅटल, सतरंजी, बिस्किटे, औषधे असे किट तयार करण्यात आले.
त्याचप्रमाणे रिलायन्स फाऊंडेशन च्या वतीने देण्यात आलेल्या मास्क चे वाटपही यावेळी करण्यात आले.
यामध्ये सुधागड 103 किट, पनवेल 306 किट, रोहा 512 किट, मुरुड 57 किट, पेण 184 किट, खालापूर 97 किट, अलिबाग 43 किट, उरण 86 किट अशा प्रकारे तालुक्यातील महिलांनी जमा केलेल्या साहित्यातून किट तयार करण्यात आले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, प्रकल्प संचालक रणधीर सोमवंशी , जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ व प्रत्येक तालुक्यातील गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत गोळा करुन वाटप करण्यात आली.
महाड तालुक्यातील लाडीवली, बिरवाडी कुंभारवाडा, भोराव गाव, कौल, कौल बौद्धवाडी, कीजलघर , कोंडिवते कोंड, शिरगाव बौद्ध वाडी, महाड शहर या गावांमध्ये तर पोलादपूर तालुक्यातील माटवण साखर, साखर आदिवासी वाडी , केवनाले, गोपाळवाडी ,लोहारमाळ येथील दरडग्रस्त गावामध्ये या किटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाकरिता जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसहीत गावातील समुदाय संसाधन व्यक्ती , ग्राम संघ आणि स्वयंसहायता समूहामधील सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच स्थानिक युवा कार्यकर्त्यांनीही योगदान दिले.

Exit mobile version