टेकाळीतील गुरचरण जमिनीवर अनधिकृत बांधकाम

सुरेंद्र कवळे यांच्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाकडून दखल; तहसीलदारांना चौकशीचे आदेश

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

समुद्रकिनाऱ्यावरील आवास परिसरातील मौल्यवान जमिनींवर धनदांडग्यांचा डोळा असतानाच टेकाळी (आवास) येथील गुरचरण जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय जमिनीचे खोदकाम, भराव आणि संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आल्याची तक्रार गावातील सुरेंद्र कवळे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची जिल्हा प्रशासनाने दखल घेत अलिबागच्या तहसीलदारांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता तहसीलदार विक्रम पाटील काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

मांडवा बंदरालगत असलेल्या आवास परिसरातील जमिनीला सोन्याचे मोल आले आहे. सेलिब्रिटींसह धनदांडगी मंडळी या परिसरात जमिनी खरेदी करून आलिशान घरे उभारत आहेत. मात्र, याच भागातील टेकाळी येथील गट क्रमांक 189 ही गुरचरण जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचा आरोप आहे.
तक्रारदार सुरेंद्र कवळे यांच्या म्हणण्यानुसार, महसूल अभिलेखात ही जमीन गुरचरण म्हणून नोंद असून, अटी व शर्तींवर आवास ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली आहे. गावातील जनावरांच्या चराईसाठी आणि सामायिक वापरासाठी असलेल्या या जमिनीवर कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता खोदकाम, भराव आणि संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशीही दिवस-रात्र अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आर्थिक हितसंबंध आणि राजकीय प्रभावाचा वापर करून या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले असून, त्यामुळे जमिनीचे मूळ स्वरूपच नष्ट झाले आहे. गावाच्या सामायिक वापरासाठी एक इंचही जमीन शिल्लक राहिलेली नाही, अशी गंभीर बाब कवळे यांनी तक्रारीत मांडली आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांना पत्र पाठविले आहे. अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता महसूल विभाग प्रत्यक्ष कारवाई करणार की हे प्रकरण कागदोपत्रीच राहणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version