आवासमधील बांधकामाची होणार चौकशी
| अलिबाग | प्रतिनिधी |
आवास गावातील समुद्रकिनारी पांडवादेवी मंदिराजवळ सीआरझेडचे उल्लंघन करीत बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब गावामधील सुधाकर राणे यांच्यासह काही ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळपाहणी केली असून, चौकशी अहवाल सादर करण्यात येणार आहे.
आवास येथील पांडवादेवी मंदिराजवळ गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकाम सुरु आहे. ही जागा सीआरझेडमध्ये समाविष्ट असताना बांधकाम केले जात आहे. डबर सोलिंग करून समुद्राची वाळू बेकायदेशीररित्या काढून बांधकामासाठी वापरली जात आहे. अनधिकृत बांधकामांना प्रशासनाचा वरदहस्त असल्याचे पहावयास मिळत आहे. या बांधकामाबाबत नियोजन प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण, पर्यावरण विभाग यांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. सीआरझेडचे उल्लंघन करीत होणाऱ्या बांधकामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी, सदरचे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी सुधाकर राणे, रुपेश राणे, जगन्नाथ घरत, संतोष नागवेकर, मच्छिंद्र कवळे, विश्वनाथ घरत, नैनेश राऊळ, सुरेंद्र कवळे, समीर पाटील यांनी उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्याकडे केली होती. 11 जुलै रोजी याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनानंतर उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दखल घेत या अनधिकृत बांधकामाबाबत स्थळपाहणी करून त्या कामाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीदारांना दिले आहेत.