प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन
| अलिबाग | प्रतिनिधी |
रोह्यामध्ये विकासकांच्या फायद्यासाठी शासनाचा निधी वापरण्याचे काम नगरपरिषदेकडून सुरु असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र दिवेकर यांनी करीत एमआयडीसीच्या जागेत नगरपरिषद स्लॅब टाकत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के यांच्या दालनात 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे दिवेकर यांनी तूर्तात सोमवारी होणारे उपोषण मागे घेतले आहे.
सातमुशी गटाराची जागा एमआयडीसीच्या मालकीची आहे. या जागेशी रोहा नगरपरिषदेचा काहीही संबंध नसताना, विकासकाच्या भल्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करून बेकायदेशीररित्या शासनाच्या निधीचा अपव्य होत आहे.स्लॅबशेजारी तयार होत असलेल्या 14 मजली अनियमित इमारतीसाठी विकासकाच्या फायद्यासाठी निधी वापरण्याचे काम चालू असल्याचा आरोप दिवेकर यांनी केला. नगरपरिषद प्रशासनकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने दिवेकर यांनी अखेर न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत न्यायासाठी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. अखेर या तक्रारीची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी शाम पोशेट्टी यांनी दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्हाप्रशासनाने दखल घेतल्याने दिवेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, बैठकीत योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्याबरोबरच ईडीची चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याचे जितेंद्र दिवेकर यांनी सांगितले.