नोटिस बजावून देखील प्रताप सुरुच
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ल्यात खुलेआमपणे अनधिकृत बांधकाम सुरु आहे. पुरातत्व विभागाने अनेकवेळा नोटीस बजावून कारवाई केली आहे. तरीदेखील धनदांडग्यांकडून हा प्रताप सुरुच आहे. बांधकाम करणारा आमदार दळवी यांचा समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे.
रेवदंडा येथील आगरकोट किल्ला हा पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नाही. पुरातत्व विभाग केंद्रीय सर्वेक्षण विभागाच्यावतीने किल्ला परिसरात नियमावलीचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तरीदेखील काही मंडळी याठिकाणी बांधकाम करत आहेत. प्राचीन स्मारक 1958च्या 24व्या प्राचीन स्मारके, पुरातन स्थळे व अवशेष अधिनियमान्वये हा किल्ला राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जाहीर करण्यात आले आहे. जर कोणी व्यक्ती या स्मारकाची नासधूस, स्थलांतर, हानी, स्वरूप बदल, खराबी, दुरूपयोग करेल अथवा धोक्यात आणेल, त्या व्यक्तीला दोन वर्षे कारावास किंवा 1 लाख रूपये दंड अथवा दोन्ही शिक्षेस पात्र राहील. तसेच, नियम 32 अन्वये प्राचीन स्मारके, पुरातत्वयीय स्थळे आणि अवशेष अधिनियम 1958 अन्वये संरक्षित स्मारकांच्या सीमेपासून 100 मीटरपर्यंत आणि त्यापलीकडे 200 मीटरपर्यंत खणणे, बांधकाम करणे यासाठी प्रतिबद्ध आणी निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे या फलकांवर निर्देश केले आहे. त्यामुळे केंद्रीय सर्वेक्षण विभागाची नियमावली फक्त फलकांवर असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी एका बांधकाम करणार्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. परंतु, तरीदेखील नियमबाह्य बांधकामे खुलेआमपणे केली जात आहेत. नियमबाह्य कामे थांबविण्यास पुरातत्व विभाग उदासीन ठरत आहे. फक्त नोटीस देऊन आपल्याकडील जबाबदारी ढकलण्याचे काम हे करीत असल्याचा आरोप काही इतिहासप्रेमींकडून केला जात आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षतेबद्दल इतिहासप्रेमी मंडळी व ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.
फलकांवरील नियमावलीकडे दुर्लक्ष
आगरकोट किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात बेसुमार नियमबाह्य बांधकामे झाली असून, काही ठिकाणी आजही चालू आहेत. अनेक ठिकाणी अवशेष, पुरातन वास्तूंची मोडतोड करून नव्याने बांधकामे केली जात आहेत. पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता हे अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षण विभागाने नव्याने नियमावलीचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. तरीदेखील या फलकांवरील नियमावलीकडे दुर्लक्ष करून किल्ला परिसरात नियमबाह्य बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे या फलकांवरील नियमावली येथे भेटी देणारे इतिहासप्रेमी मंडळी व ग्रामस्थांना वाचण्यासाठी आहेत, असेच म्हटले जात आहे.
बांधकाम करणारे आमदारांचे समर्थक
आगरकोट किल्ल्यामध्ये होत असलेले बांधकाम विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांचे समर्थक करीत असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. ते समर्थकही लोकप्रतिनिधी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडून हा प्रकार होत असल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत.
आगरकोट किल्ल्याच्या परिसरात बांधकाम करण्यास कोणतीही परवानगी दिली नाही. मागील काही महिन्यांपासून या परिसरात काही मंडळी खुलेआमपणे अनधिकृत बांधकाम करीत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा सुरु असलेल्या बांधकामविरोधात कारवाई केली जाईल.
एलिकर,
अधिकारी, पुरातत्व विभाग