‘पेस्टल जर्नल’ मासिकाच्या मागील पृष्ठभागावर स्थान
। कर्जत । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारी चैतन्यशील कलाकृती अमेरिकेत प्रसिद्ध होणार्या प्रतिष्ठित मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेले कलाकार पराग बोरसे यांच्या चैतन्यशील चित्राने अमेरिकेतील प्रसिद्ध आणि जगातील सर्वात मानाचे ‘पेस्टल जर्नल’ या मासिकाच्या समर 2025 आवृत्तीच्या मागील पृष्ठभागावर स्थान मिळवले आहे. त्यामुळे भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण ठरत आहे.
सॉफ्ट पेस्टल्स या माध्यमात कॅन्सॉन या कागदावर साकारलेले हे चित्र एका महाराष्ट्रीयन मेंढपाळ शेतकर्याचे पोट्रेट आहे. लाल रंगाच्या पार्श्वभूमीमुळे हे चित्र अत्यंत उठून दिसत आहे. पराग बोरसे यांच्या मते, ही पार्श्वभूमी ग्रामीण भारताच्या उर्जेचे, ताकदीचे आणि आत्मसमानाचे प्रतीक आहे. अमेरिकेतील अग्रगण्य पेस्टल साहित्य पुरवणारी कंपनी डकोटा पेस्टल्स यांनी या चित्राचा समावेश त्यांच्या संपूर्ण पानाच्या जाहिरातीत केला आहे. पेस्टल जर्नल सारख्या जागतिक कीर्तीच्या व्यासपीठावर ही कलाकृती झळकणे, हा पराग बोरसे यांच्यासाठी अत्यंत मानाचा क्षण आहे.
पराग बोरसे यांनी मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट येथून शिक्षण घेतले असून त्यांच्या प्रगल्भ शैलीमुळे आणि भारतीय जीवनाचे हुबेहूब चित्रण करणार्या कलाकृतीमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक सन्मान पटकावले आहेत. त्यांची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी वाटचाल भारतीय कलेचा जागतिक मंचावर वाढता प्रभाव अधोरेखित करत आहे.
अशा क्षणांमुळे कलेबद्दलचा उत्साह अधिक वाढतो आणि पेस्टल आर्टच्या अमर्याद शक्यता शोधण्याची प्रेरणा मिळते. ही सन्मानाची बाब आहे.
पराग बोरसे,
चित्रकार