ग्रामपंचायतीचे तहसीलदारांकडे लेखी तक्रार
। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत खांडपे हद्दीतील शासकीय गुरुचरण जागेतील माती अनधिकृतरित्या काढून नेल्या बाबत खांडपे ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्राम विकास अधिकारी यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली, असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे याकडे आता कर्जत महसूल विभाग काय कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रुप ग्रामपंचायत खांडपे सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी कर्जत तहसीलदार व कर्जत पोलीस ठाणे यांना दिलेल्या पत्रामध्ये ग्रामपंचायत खांडपे यांच्या नावे असलेल्या मौजे मुळगावतर्फे वासरे येथील शासकीय गुरुचरण सर्व्हे नंबर 68 क्षेत्र 0.71.00 ग्रामविकास विभाग यांच्या नावे असलेल्या गट नंबर 75 क्षेत्र 0.51.00 या जागेतील मातीचे उत्खनन सुट्टीच्या दिवसाचा फायदा घेऊन अनधिकृतपणे मुळगाव तर्फे वासरे येथील अनुराधा विनोद ति-हेकर व केतन कृष्णा बेलसरे यांच्या नावे असलेल्या सर्व्हे नंबर 58/6 व 59/6 मध्ये जेसीपी डंपर चा वापर करून नेऊन टाकल्याचे निदर्शनास आले असून पोलीस पाटील, सरपंच ग्रामपंचायत खांडपे तंटामुक्त अध्यक्ष यांनी जागेवर जाऊन पंचनामा करून खात्री केली आहे. तरीही संबंधितांविरुद्ध शासकीय जमिनीचे नुकसान केल्या बाबत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.