| माथेरान | मुकुंद रांजणे |
माथेरान येथे ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी असल्याने अंतर्गत वाहतुकीसाठी हातरिक्षाचा वापर केला जातो. गुरुवारी (दि. 31) सकाळी परशुराम उर्फ कालुराम पिरकट (वय 45) या आदिवासी हातरिक्षाचालकाचा रिक्षा ओढताना हॉटेल शालिमारजवळ दुर्दैवी मृत्यू झाला.
मोरबे डॅम चौकजवळील निंबरवाडी येथील आदिवासी वाड्यात परशुराम राहतो. गेल्या 15 वर्षापासून माथेरान येथे हातरिक्षा ओढण्याचे काम करून तो उपजीविका करीत होता. मागील काही वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मजूर इथे हा व्यवसाय करीत असता त्यातील अनेक जणांचा रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झाला आहे. तर काहींना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
सध्याचा ई-रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण होत आला असून उर्वरित ई-रिक्षांना परवानगी देताना पायलट प्रोजेक्ट करू नये. थेट कायमस्वरूपी परवानगी द्यावी. सर्वांना ई-रिक्षांची आवश्यकता असून गावातील सगळेचजण या सेवेचा लाभ मोठया आनंदाने घेत आहेत. तरी लवकरच उर्वरित 74 ई-रिक्षांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी श्रमिक रिक्षा संघटनेचे कार्यतत्पर उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांनी केली आहे.
हातरिक्षा ओढताना हृदयावर प्रचंड ताण पडतो.
कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी नाईलाजाने ही अतिकष्टदायी कामे करावी लागत आहेत. त्यामुळेच या अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळावी, यासाठी ई-रिक्षाची मागणी श्रमिक रिक्षा संघटनेतर्फे केली आहे. आतापर्यंत 20 हातरिक्षा मालकांना ई-रिक्षाची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरीत 74 हातरिक्षाचालक अद्याप ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत आहेत.