मोबाईलच्या युगात नांगर हातात

वावेलवाडी शाळेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांनी अनुभवला लावणीचा आनंद

| श्रीवर्धन | संदेश घोलप |

आधुनिक युगात संगणक, टीव्ही आणि मोबाईलच्या आभासी विश्वात हरवत चाललेल्या आजच्या पिढीला मातीचा सुगंध आणि शेतीचे खरे महत्त्व कळावे, या उद्देशाने श्रीवर्धन तालुक्यातील वावेलवाडी येथील राजिप शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एका विशेष भात लावणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी थेट शेतात उतरून भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

केवळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून न थांबता, शाळेच्या शिक्षकांनी स्वतः चिखलात उतरून हातात नांगर धरला आणि शेतीची कामे केली. शिक्षकांना अशा प्रकारे शेतात काम करताना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह दुप्पट झाला. गुरुजींनी दाखवलेल्या या धड्यामुळे मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. यावेळी शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच शेतातील लाल चिखलात पाय ठेवत भात लावणी केली. शिक्षकांच्या सोबतीने चिखलात काम करताना मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रत्यक्ष शेती कशी केली जाते, हे मुलांनी अगदी जवळून पाहिले व अनुभवले. या उपक्रमात स्थानिक शेतकरी सुरेश निवाते, राजू रामाणे, रमेश खाडे आणि स्थानिक महिला मंडळाने विशेष सहभाग घेतला. त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना भाताचे रोप कसे धरावे, त्याची जुडी कशी बनवावी आणि चिखलात ते योग्य पद्धतीने कसे रोवावे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वतःच्या हाताने भाताची रोपे शेतात लावली. “आपण रोज जे अन्न खातो, त्यामागे आपल्या शेतकरी राजाचे किती अथांग कष्ट असतात,” याची जाणीव या वेळी मुलांना व उपस्थितांना झाली. त्यामुळे घामातून मोती पिकवणाऱ्या बळिराजाबद्दल मुलांच्या मनात आदराची भावना अधिकच द्विगुणित झाली.

निसर्गाच्या कुशीत आणि कोकणी पारंपरिक लोकगीतांच्या सुरावर शिक्षक आणि मुलांनी या श्रमदानाचा मनसोक्त आनंद लुटला. हा उपक्रम केवळ एक प्रात्यक्षिक नसून विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत कार्यशाळा ठरली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेला हा नावीन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यामुळेच येणारी नवी पिढी आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि निसर्गाशी घट्ट जोडलेली राहील, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version