| बंगळुरू | वृत्तसंस्था |
‘एकच निर्धार, भाजप हटाव’चा नारा देत देशभरातील प्रमुख 26 विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा एकजुटीचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी यूपीए ऐवजी नवीन इंडियन आघाडी उघडण्यात आलेली आहे. बंगळुरु येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत यावर मंगळवारी (दि.170 शिक्कामोर्तब करण्यात आले.
बंगळुरू येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधाकांची आघाडी तयार कऱण्यात आली आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले असून या आघाडीचं नाव ‘इंडिया’ असे निश्चित कऱण्यात आलं आहे. काँग्रेस बंगळुरू येथे विरोधकांच्या वतीने दोन दिवसीय बैठकीचं आयोजन कऱण्यात आले होते. याच बैठकीत विरोधकांच्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात I- Indian, N – National, D-Democractic, I- Inclusive, A- Alliance असं हे नाव आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या नावाचा अर्थ भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी असा असू शकतो. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीत 26 विरोधीपक्ष उपस्थित होते.
पुढील बैठक मुंबईत
विरोधकांची पुढील बैठक आता मुंबईत होणार आहे. त्याच बैठकीत 11 जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ती नावं मुंबईत जाहीर करण्यात येतील आणि ही समिती पुढचे निर्णय घेईल, असं खर्गे यांनी स्पष्ट केलं. मुंबईतीली बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जागा वाटपासंदर्भातील अधिकार या समन्वय समितीला असणार आहेत. विरोधाकांच्या आघाडीचं एक सचिवालय दिल्लीमध्ये उभं करण्यात येणार आहे.
पंतप्रधानपदापासून काँग्रेस दूर राहणार
काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही, असं मोठं विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे. बंगळुरु इथं सुरु असलेल्या विरोधकांच्या बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळं देशाचं राजकारण आणखी वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या बैठकीत बोलातना खर्गे म्हणाले, मी स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नईत आयोजित कार्यक्रमात यापूर्वीच बोललो आहे की, काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी आणि पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही. या बैठकीत आमची भावना ही स्वतःसाठी सत्ता मिळवणं अशी नाही. आमची भावना ही संविधानाचं संरक्षण करणं, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचं संरक्षण करणं ही आहे
आमच्यापैकी काही लोकांमध्ये मतभिन्नता आहे. पण ही राज्यस्तरावर असून ती वैचारिकस्तरावर नाही. भाजपप्रणित एनडीए सरकारच्या धोरणांमुळं ज्यांना त्रास झाला आहे त्याच्यापुढं ही समस्या खूप मोठी नाही, खर्गेंनी या बैठकीत म्हटलं आहे. तसेच यासाठी त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचं उदाहरण दिलं आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार हा प्रश्न नाही. उलट विभाजीत शक्तींविरोधात लोकांनी एकत्र येणं महत्वाचं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.