सर्वसाधारण विजेतेपदावर रायगड पोलीस दलाचा शिक्कामोर्तब
। रायगड । खास प्रतिनिधी ।
18 वा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पदकांची लुट करीत आपल्या नावावर 11 सुवर्ण, 05 रजत आणि 08 कांस्य अशा एकुण 24 पदकांची कमाई करत प्रथम स्थान प्राप्त करून रायगड पाेलीस दलाने सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. पाठोपाठ सिंधुदूर्ग जिल्हा 04 सुवर्ण, 07 रजत व 04 कांस्य पदकासह दुसरे स्थान, रत्नागिरी जिल्हा 04 सुवर्ण, 04 रजत व 04 कांस्य पदकांसह तिसरे स्थान, तसेच ठाणे ग्रामीण पालघर जिल्ह्याने अनुक्रमे 08 व 03 पदकांसहीत चौथे व पाचवे स्थान प्राप्त केले.
सहा स्पर्धा प्रकार आणि 24 उपप्रकारामध्ये एकुण 15 पोलीस अधिकारी, 85 पोलीस अंमलदार तसेच श्वान पथकाने आपल्या स्वकौशल्याचे प्रदर्शन केले. स्पर्धांच्या नियमांनुसार उत्तम पैकी अतिउत्तम कामकाज करणा-या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना एकुण 21 सुवर्ण, 21 रजत व 20 कांस्य पदक प्रदान करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये कोकण परिक्षेत्रातील पाच घटकांकडुन पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदविला, सदर स्पर्धेचे आयोजन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात आले हाेते.
तपासासाठी वैज्ञानिक मदत, अँटी-सोबोटेज तपासणी, पोलिस फोटोग्राफी, पोलिस व्हिडिओग्राफी, संगणक जागरूकता आणि डॉग स्क्वाड स्पर्धा अशा मुख्य विषयांवर लेखी तसेच प्रात्यक्षिक परिक्षेचे आयोजन करून सदर विषयांचे तज्ञांच्या आधारे परिक्षण करण्यात आले होते. रायगड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पुन्हा एकदा दैदीप्यमान कामगिरी केली.
सर्व पदक विजेते यांना पोलीस अधीक्षक रायगड व अपर पोलीस अधीक्षक रायगड यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देवुन त्यांचा गौरव करण्यात आला. “सर्वसाधारण विजेतेपद ’’ प्राप्त केलेल्या संघास प्रशस्त ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तद्नंतर सदर स्पर्धा निपक्ष:पाती व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सहयोग करणा-या सर्व परिक्षकांना सन्मानचिन्ह देवुन त्यांचे आभार व्यक्त केले. स्पर्धे अंती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सदर स्पर्धेमधील सर्व पदक प्राप्त स्पर्धकांचे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले व भविष्यात राज्यस्तरावर व देशपातळीवर देखील अशाच प्रकारे आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करून उत्तम कामगिरी करणेकरीता सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.