कर्जत तालुक्यात लग्न मंडपाचे नुकसान
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ- कळंब- कशेळे या भागाला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. या वादळी वाऱ्यामुळे सर्व ठिकाणी सुरू असलेले लग्न सोहळे यांचे मोठे नुकसान झाले. विवाह सोहळ्याचे ठिकाणी असलेले कापडी मंडप वाऱ्याने नुकसानग्रस्त झाले, तर विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या. मात्र, उकाड्याने त्रस्त झालेल्या लोकांना वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने काहीसा दिलासा मिळाला.
कर्जत तालुक्यात सध्या लग्नसराईची मोठी धामधूम सुरू आहे. मात्र, सायंकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने या आनंदावर विरजण घातले. या पावसाचा सर्वाधिक फटका सुरू असलेल्या विवाह सोहळ्यांना बसला असून, तालुक्यातील अनेक ठिकाणी उभारलेले भव्य लग्नमंडप पावसाच्या पाण्याने ओले चिंब झाले त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात लग्नाचे मुहूर्त असल्याने ठिकठिकाणी मंडप आणि जेवणावळींची तयारी सुरू होती. दुपारपर्यंत कडक ऊन असताना अचानक सायंकाळी आभाळ भरून आले आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. काही वेळातच विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या संकटामुळे वधू-वर पक्ष आणि पाहुण्यांची मोठी धावपळ उडाली. तसेच मंडप साहित्याचे नुकसान झाले असून यामध्ये मंडपातील विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपके आणि सजावटीचे साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नेरळ विद्या मंदिर शाळेचे मोठे नुकसान या वादळी वाऱ्याने केले. तेथील सहा वर्ग खोल्यांची पत्रे उडाली असून, शाळेला सुट्टी असल्याने बंद होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही इजा पोहचली नाही. शाळा व्यवस्थापन कडून सर्व लोखंडी पत्रे पुन्हा टाकले जात असून, मोठा आर्थिक भार व्यवस्थापनावर आला आहे.







