अपघाताला निमंत्रण; प्रशासनाची बघ्याची भूमिका
। उरण । प्रतिनिधी ।
उरण शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या उरण चारफाटा सर्कलवर मोठमोठे बॅनर लावून प्रशासन थेट अपघातांना निमंत्रण देत आहे, असा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वाहतुकीसाठी उभारण्यात आलेले सर्कल आज बॅनरबाजी, अतिक्रमण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे धोक्याचे केंद्र बनले आहे.
उरण शहरात प्रवेश करताना होणारी सततची वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी उरण चारफाटा येथे सर्कल उभारून हायमास्ट दिवा बसवण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती सुधारण्याऐवजी वाहतूक कोंडी अधिकच गंभीर होत असल्याचे चित्र आहे. या मार्गावर अनधिकृत फेरीवाले, रविवारचा बेकायदेशीर आठवडा बाजार यांचा सुळसुळाट झाला असून, याबाबत शासकीय यंत्रणा आर्थिक साटेलोटामुळे मौन बाळगून असल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेकायदेशीरपणे उभी राहणारी छोटी-मोठी वाहने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडवत आहेत.
इतकेच नव्हे तर सर्कलच्या भोवती मोठमोठे बॅनर लावण्यात आल्याने वाहनचालकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण होत असून समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत नाहीत. परिणामी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागं होणार का? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. तरी उरण चारफाटा सर्कल परिसरात बॅनर लावण्यास तात्काळ व सक्त मनाई करावी, अतिक्रमणे हटवावीत व वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. जर भविष्यात येथे कोणताही गंभीर अपघात घडला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शासकीय यंत्रणांवरच राहील, असा स्पष्ट इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
