नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील गिरीराज आनंदनगर येथील गिरीराज सोसायटीमधील भाडे तत्त्वावर असलेले पोस्ट ऑफिस सध्या धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतीत कार्यरत असून, यामुळे नागरिकांच्या आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
ही इमारत जुनी असून, तिच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत, छताचा काही भाग कोसळण्यास सुरुवात झाली आहे. नगरपालिकेने एक-दीड वर्षांपूर्वी धोकादायक इमारत जाहीर करून तशी नोटीस ही संबंधित सोसायटीला देऊन त्वरित रहिवाशांनी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बहुतांश रहिवासी हे स्थलांतरित झाले आहे. मात्र, भाडे तत्त्वावर असलेले पोस्ट ऑफिस आजही सुरू आहे. याबाबत सोसायटीने पोस्ट ऑफिसच्या वाशी व उरण येथील कार्यालयाकडे अनेकवेळा लेखी पत्रव्यहार करून आजच्या घडीला कित्येक महिने उलटूनही गेंड्याच्या कातडीचे पोस्ट विभागाचे अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे उघड होते. गिरीराज सोसायटीच्या पदाधिकार्यांनी अनेकवेळा वाशी पोस्ट ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी वर्गाची भेट घेऊन विनवणी केली आहे. तरीही अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना ग्राहकांच्या सुरक्षितेबाबत कोणतेही सोयरसुतक नसल्याचे उघड होते. यामुळे या ठिकाणी येणारे शेकडो नागरिक आणि पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सोसायटीने याबाबत नगरपालिका व पोलीस प्रशासन यांना लेखीपत्राद्वारे तक्रार करून प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, पोस्ट ऑफिस सुरक्षित जागेत हलविण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. भविष्यात दुर्घटना घडू नये यादृष्टीने पोस्ट ऑफिस तात्काळ सुरक्षित इमारतीत हलवावे. तसेच धोकादायक इमारतीची तपासणी करून तिचे पुनरुज्जीवन करावे किंवा ती पाडावी. प्रशासनाने पोस्ट ऑफिस चालवण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा होणार्या दुर्घटनेस सोसायटी जबाबदार राहणार नसल्याचे सोसायटीच्या पदाधिकार्यांनी सांगितले.