नागरिकांची पोलिसांवर प्रचंड नाराजी
। उरण । वार्ताहर ।
काही महिन्यांपासून उरण पोलीस ठाण्यातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. यातच काही दिवसांपूर्वी द्रोणागिरी नोडमध्ये भीषण अपघाताची घटना घडली होती. याबाबत कोणताही गुन्हा अथवा कारवाई अद्याप झालेली दिसत नाही. उलट ज्यांच्या मुलीच्या हातून हा गुन्हा घडला त्या एका नामांकित शाळेच्या प्रिन्सिपल आहेत. आणि त्यांनी आयोजित केलेल्या शाळेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उरणचे नवनिर्वाचित वपोनि जितेंद्र मिसाळ यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला. त्यांच्या सत्काराप्रसंगी प्रिन्सिपल तसेच शाळेचे कमिटी मेंबरही उपस्थित होते. यामुळे, पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे. यामुळे उरणचा बिहार होण्याच्या मार्गावर असल्याने संतापाची लाट पसरली आहे.
उरण रेल्वे स्थानकाबाहेर झालेले ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा असाच प्रकार उरण-द्रोणगिरी नोड येथे घडला आहे. देवकृपा चौक येथे एका भरधाव होंडा सिटी गाडीने 4 ते 5 जणांना उडवल्याची धक्कादायक घटना 24 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ही गाडी एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क करून कव्हर टाकून ठेवली असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास उरण पोलिस करीत असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नसून अपघातग्रस्त वाहनही ताब्यात घेतलेले नाही.
याबाबत उरण पोलिसांकडे विचारणा केली असता कारवाई सुरू असल्याचे थातुरमातुर उत्तरे दिली जात आहेत. प्रत्यक्षात कोणती कारवाई व गुन्हा दाखल केल्याची कोणतीही माहिती दिली जात नाही. यामुळे पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघड होत आहे.