गोदामवाल्यांची मुजोरी, प्रशासनाची दलाली; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा भडका
| उरण | प्रतिनिधी |
नुकतीच उरण तालुक्यातील वेश्वी येथील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला आग लागल्याची घटना घडली. या आगीने प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बुरखा फाडला आहे. उरणमध्ये यापूर्वीही अनेक भीषण आगी लागल्या आहेत. त्यात अनेकांचे जीव गेले, तर अनेक जखमी झाले; परंतु, या दुर्घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आज एका गोदामाला आग लागली, उद्या दुसऱ्या गोदामात दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आगींचे हे सत्र थांबले नाही तर उरणच्या माथी एखादी महाभयानक दुर्घटना मारली जाण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे उरणचा भोपाळ होण्याची वाट पाहताय का, असा संतप्त सवाल उरणकरांमधून उपस्थित होत आहे.
उरण तालुक्यातील वेश्वी येथील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला नुकत्याच लागलेल्या भीषण आगीने प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बुरखा फाडला आहे. विशेष म्हणजे याच गोदामाला यापूर्वीही भीषण आग लागल्याचे सांगितले जात असून, त्यावेळी हे प्रकरण दडपण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आता पुन्हा त्याच गोदामाला आग लागल्याने संशयाचा धुरळा उडाला आहे. त्यातच उरणमध्ये गोदामांची संख्या वाढत आहे. त्यासाठी येथील कांदळवनांवर भराव टाकल्याच्या तक्रारी आहेत. पावसाळी नाले बुजवले जात असल्याचे देखील आरोप आहेत. त्यामुळे येथील पर्यावरणावर घाला घालून अवैधरित्या गोदाम उभे केले जात असल्याचा आरोप उरणकरांमधून होत आहे.
दरम्यान, लॅटिनम लॉजिस्टिक गोदामात आगीने रौद्ररूप धारण केल्यावर अग्निशमन दलाला पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. त्यांच्यावर वेश्वी गावातील तलावातून पाणी आणण्याची वेळ आली. या गोदामांमध्ये कोट्यवधींचा माल साठवला जात असून, तेवढीच उलाढाल होते; परंतु, या गोदामांत आग विझवण्यासाठी पुरेसे पाणी आणि अग्निसुरक्षेची साधने उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे हा व्यवसाय आहे की नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला जुगार, असा संताप उरणकरांमधून व्यक्त केला जात आहे.त्यामुळे आज एका गोदामाला आग लागली, उद्या दुसऱ्या गोदामात दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आगींचे हे सत्र थांबले नाही तर उरणच्या माथी एखादी महाभयानक दुर्घटना मारली जाण्याची भीती देखील वर्तविली जात आहे.
उरणमध्ये भोपाळसारखी महाभयानक परिस्थिती निर्माण झाल्यावर प्रशासन जागे होणार का? दुर्घटना घडल्यावर मृतदेहांच्या ढिगाऱ्यांवर उभे राहून चौकशीचे आदेश देण्यात काय अर्थ आहे? आजच प्रशासनाने जागे होऊन उरणमधील सर्व यार्ड आणि गोदामांचे अग्निसुरक्षा व कायदेशीर ऑडिट करावे. वेश्वीतील गोदामाला यापूर्वी लागलेल्या आगीची आणि आताच्या आगीची उच्चस्तरीय चौकशी करावी. अग्निशमन प्रमाणपत्रे, पाणीसाठा, आपत्कालीन मार्ग, कांदळवनांवरील अतिक्रमणे आणि नाल्यांवरील भराव यांची तपासणी करावी. नियम मोडणाऱ्यांना केवळ दंडाची पावती देऊन पुन्हा धंदा करण्याची मोकळीक न देता कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी उरणकरांमधून जोर धरत आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेचा धूर
एखादी दुर्घटना घडली की पंचनामे, चौकशीचे आदेश आणि आश्वासनांचा बाजार मांडला जातो. मात्र, त्यानंतर सारे काही शांत होते. जनतेचे जीव गेले तरी प्रशासनाच्या संवेदना जाग्या होत नसतील, तर या खुर्च्यांवर बसून संबंधित प्रशासन नेमके करतय तरी काय? ही आग गोदामात लागली, परंतु, धूर मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निघत असल्याचे बोलले जात आहे. येथील गोदामवाल्यांच्या तिजोऱ्या भरताना उरणकरांच्या जीवाची किंमत शून्य झाली का? उद्या उरणमध्ये भोपाळपेक्षाही भयानक दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? अशा गोदाम मालकांना नक्की कोणता अधिकारी अभय देत आहे? त्यामुळे उरणकरांना आता आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी.
सुरक्षेपेक्षा राजकीय हितसंबंध मोठे?
या सगळ्या प्रकारावर राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींचे मौन अधिकच बोलके आहे. जनतेच्या जीवाचा प्रश्न असताना राजकीय नेत्यांच्या तोंडाला कुलूप का? काही गोदामे राजकीय नेते किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालकीची असल्याची चर्चा जनतेत आहे. त्यामुळेच कारवाईच्या प्रश्नावर राजकीय मंडळी गप्प का आहे? जनतेच्या सुरक्षेपेक्षा राजकीय हितसंबंध मोठे आहेत का? राजकारणाच्या आडून नियम मोडणाऱ्यांना संरक्षण मिळत असेल तर हा लोकशाहीचा नव्हे, तर सत्तेच्या माजाचा बाजार असल्याचे उरणकरांमधून बोलले जात आहे.






