राजकारण्यांची मूकसंमती की मतांचं राजकारण?
| उरण | प्रतिनिधी |
उरणच्या जनतेला मैदान हवंय म्हणून मोर्चे निघत आहेत, घोषणांनी आभाळ दणाणतंय. पण, ज्याची खरी गरज आहे, ते सुसज्ज हॉस्पिटल, आगरी-कोळी-कराडी भवन, त्या प्रश्नांवर राजकीय पक्ष गप्प का? मैदानासाठी आंदोलकांना साथ देणारे पुढारी, इतर मूलभूत गरजांवर गप्प बसतात, यामुळे जनतेत तीव्र संतापाचं वातावरण आहे.
उरण औद्योगिक दृष्टीनं भरभराटतंय, पण त्या विकासाच्या नावाखाली अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय. हॉस्पिटलचं नाव घेतलं की सगळे नेते बधीर होतात. गेली 12 वर्षे भूखंड मिळूनही हॉस्पिटल उभं राहिलं नाही, कारण काय? कुचकामी प्रशासन की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव?
एकीकडे इतर परप्रांतीय समाज त्यांच्या भवनासाठी सरकारी दारं ठोठावतात आणि उभं करतातही, पण स्थानिक आगरी, कोळी, कराडी समाजासाठी मात्र भवनाचं नावही घेतलं जात नाही! ही काय स्थानिकांवरील अन्यायाची परिसीमा नाही का? खेळाडूंना मैदान मिळालं, पण दुखापत झाली तर जायचं कुठं? कधीही जीवावर बेतणाऱ्या अपघातांचं उत्तर कोण देणार?
उरणच्या भूमीपुत्रांनी आता केवळ मैदानासाठी नाही, तर हॉस्पिटल, समाज भवनं आणि इतर प्रश्नांसाठीही रस्त्यावर उतरायला हवं. केवळ फोटो काढणाऱ्या नेत्यांना प्रश्न विचारा ‘फक्त मैदानावरच राजकारण? उरणच्या जखमांवर फुंकर कोण घालणार?’