भरधाव ट्रेलरच्या धडकेत उरणच्या तरुणाचा जागीच मृत्यू

। जेएनपीटी । अनंत नारंगीकर ।
द्रोणागिरी नोड परिसरातील खासगी प्रकल्पात सेक्युटरी म्हणून काम करणार्‍या कामगारांच्या मोटारसायकला खोपटा पुलाजवळ भरधाव वेगात जाणार्‍या ट्रेलरने जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार संदिप पाटील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संदिप पाटील हा मूळचा वशेणी गावचा रहिवासी आहे. या अपघाताची माहिती मिळताच उरण पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. यावेळी उरण परिसरातील नागरिकांनी, कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन भरधाव वेगात जाणार्‍या ट्रेलरवर निर्बंध घालण्यात यावे तसेच संदिप पाटील यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.

उरण तालुक्यात जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून कंटेनर यार्डचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामूळे या कंटेनर यार्डमधून बंदराकडे ये-जा करणार्‍या मालवाहू अवजड वाहनांची रेलचेल मोठ्या संख्येने रात्री अपरात्री सुरू असते. अशा अवजड वाहनांवर नियंत्रण कोणाचेच नसल्याने होणार्‍या अपघातात अनेक निष्पाप कामगार, तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

मंगळवारी (दि.21) सकाळी 8-15 च्या सुमारास वशेणी गावातील तरुण कामगार संदिप पाटील हा आपल्या मोटारसायकलवरून नेहमीप्रमाणे द्रोणागिरी नोड परिसरातील खासगी प्रकल्पात सेक्युटरी म्हणून कामावर जात असताना खोपटा पुलाजवळ भरधाव वेगात येणार्‍या मालवाहू अवजड ट्रेलरने धडक दिली. या झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार संदिप पाटील या कामगारांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती मिळताच या रस्त्यावर ये -जा करणार्‍या कामगारांनी, तरुणांनी गर्दी करत संताप व्यक्त केला.

Exit mobile version