माणगावमधील कोंडी टाळण्यासाठी चालकांची अनोखी युक्ती!
। पाली । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी आता प्रवाशांच्या संयमाची परीक्षा घेत आहे. विशेषतः वीकेंडला या भागात लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे प्रवासी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाकडून बायपासचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असतानाच, आता वाहनचालक आणि पर्यटकांनी या कोंडीतून सुटण्यासाठी एक ‘अनोखी युक्ती’ शोधून काढली आहे. माणगाव शहरातील मुख्य बाजारपेठेची कोंडी टाळण्यासाठी चालक चक्क अपूर्ण अवस्थेत असलेल्या बायपासच्या मार्गाचा आणि अंतर्गत ग्रामीण रस्त्यांचा वापर करत आहेत.
माणगाव बायपासचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, काही भागातील मार्गाचे काम अपूर्ण आहे. मात्र, रोजच्या कोंडीला कंटाळलेल्या प्रवाशांनी यातून सुटकेसाठी स्मार्ट उपाय शोधला आहे. कोकणातून मुंबई-पुण्याकडे जाणारे प्रवासी व चालक माणगाव शहरात न शिरता थेट ढालगर फाट्यावरून अपूर्ण बायपासच्या मार्गाने खर्डी फाट्यापर्यंत प्रवास करतात आणि पुढे निजामपूरमार्गे मुंबई-पुण्याच्या दिशेने निघून जातात. मुंबई-पुण्याकडून कोकणात जाणारे प्रवासी हे निजामपूरमार्गे माणगावाच्या आधी खर्डी फाट्यावरून या बायपासच्या रस्त्याचा वापर करत ढालगर फाट्यापर्यंत येतात. या अंतर्गत जोडण्यांमुळे प्रवाशांना माणगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत लागणाऱ्या भीषण कोंडीचा सामना करावा लागत नाही आणि त्यांचा तब्बल पाऊण ते एक तासाचा वेळ वाचत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खासदार सुनील तटकरे यांनी मे अखेरपर्यंत रस्ता व बायपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोकण रेल्वेच्या विद्युत खांबांचा तांत्रिक अडथळा आणि संथ गतीमुळे हा बायपास अधिकृतपणे सुरू होऊ शकलेला नाही. एकीकडे प्रशासन डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरत असताना, दुसरीकडे प्रवाशांनी स्वतःच हा पर्यायी मार्ग शोधून काढल्याने महामार्गावरील ‘स्मार्ट’ प्रवासाची सध्या चर्चा सुरू आहे.
मात्र प्रवास धोकादायक!
वाहनचालक कोंडीतून वाचण्यासाठी या अपूर्ण बायपासचा आणि अंतर्गत रस्त्यांचा वापर करत असले, तरी हा प्रवास पूर्णपणे सुरक्षित नाही. अनेक ठिकाणी रस्ता अजूनही कच्चा आहे, दिशादर्शक फलक नाहीत आणि रस्त्याचे काम सुरू असल्याने खडी व माती पसरलेली आहे. त्यातच भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, काही बेशिस्त चालक या अरुंद अंतर्गत मार्गावरही लेन सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने तिथेही नवीन कोंडी निर्माण होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
