साडेबारा टक्क्यांच्या भरावासाठी डेब्रिजचा वापर

प्रकल्पग्रस्तांत नाराजीचा सूर

| उरण | वार्ताहर |

जेएनपीए प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप करण्यासाठी भरावाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, यासाठी मातीऐवजी डेब्रिजचा भराव केला जात आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांत नाराजीचा सूर निघत आहे.

गेली अनेक वर्षांपासून जेएनपीए साडेबारा टक्क्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यासाठी अनेकवेळा मोर्चे, आंदोलने व निदर्शने करण्यात आली होती. यानंतरच जेएनपीए प्रशासनाने मंजुरी देत लवकरच साडेबारा टक्के भूखंड वाटपासाठी हिरवा कंदील दिला होता. यासाठी जेएनपीए प्रशासनाने दास्तान फाटा येथून मोकळ्या जागेवर भराव करण्याचे काम सुरू केले आहे. दास्तान फाटा पासून युद्धपातळीवर भरावाचे काम सुरू आहे. या भरावासाठी सुरुवातीला मातीचा वापर करण्यात आला होता. परंतु, आता तर मातीऐवजी डेब्रिजचा सर्रासपणे वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत जेएनपीए प्रशासन कोणतीच ठोस कारवाई करताना दिसत नाही.

गेली अनेक महिन्यापासून मातीच्या भरावाचे काम सुरू आहे. मातीपेक्षा डेब्रिज झटकेपट मिळत आहे. तसेच भरावासाठी माती मिळत नसल्याने नाईलाजाने डेब्रिजचा वापर करावा लागत असल्याचे वाहन चालक मालक सांगतात. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्केचे भूखंड देण्यासाठी प्रशासनाकडून दास्तान फाटा पासून करळ फाटा पर्यंत भरावाचे काम सुरू आहे. परंतु, भरावासाठी मातीऐवजी डेब्रिजचा वापर केला जात असल्याने प्रकल्पग्रस्तांत नाराजीचा सूर निघत याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version