ग्रामस्थांना निर्जंतुक पाण्याची सुविधा; विदेशी मान्यवरांची उपस्थिती
| चणेरा | प्रतिनिधी |
वरसे ग्रामपंचायत हद्दीतील निवी गाव व वाडीपाड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेला महाराष्ट्रातील पहिलाच जपानी तंत्रज्ञानावर आधारित यूव्ही वॉटर फिल्टर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत हा नाविन्यपूर्ण व लोकहिताचा प्रकल्प यशस्वी झाल्याचे अधोरेखित करण्यात आले.
जपानमधील स्टॅन्ली कंपनीने विकसित केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बसविण्यात आलेला हा यूव्ही फिल्टर प्रकल्प महाराष्ट्रात प्रथमच निवी गावात राबविण्यात आला आहे. सुरक्षित, स्वच्छ व निर्जंतुक पाणी ग्रामस्थांना सहज उपलब्ध व्हावे, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी जायका तसेच ओरिजनल इंजिनियरिंग कन्सल्टंट लिमिटेड यांनी आर्थिक पाठबळ दिले. तर विवेकानंद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने तांत्रिक व संशोधनात्मक सहकार्य केले आहे.
हा लोकार्पण सोहळा स्टॅन्ली कंपनीचे अध्यक्ष मासाहीकी इंचिचानगी सन, टोनी सन, युवासाकी सन, उगियोरा सन, एक्सेल इंडस्ट्रीजचे सेक्रेटरी सुरेंद्र संघवी, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, माजी सरपंच अमित मोहिते, जायका कंपनीचे युसुके सातो सन, ओरिजनल इंजिनियरिंग कन्सल्टंटचे यामुनाची सन, हाचाकावा सन, तसेच श्री विवेकानंद रिसर्चचे सुशिल रुळेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी निवी ग्रामस्थ, महिला व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचायत समिती रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली निवी गाव, निवी आदिवासी भाग, ठाकूरवाडी तसेच शासकीय रुग्णालय अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी एकूण 215 लहान-मोठ्या क्षमतेचे दोन प्रकारचे यूव्ही पाणी फिल्टर युनिट बसविण्यात आले आहेत. जवळपास तीन वर्षे या प्रकल्पावर संशोधन, विविध चाचण्या व ट्रायल घेण्यात आल्या. त्यानंतर हा प्रकल्प यशस्वी ठरला असून या संशोधन प्रक्रियेची सविस्तर माहिती लोकार्पण सोहळ्यात सादर करण्यात आली. यूव्ही फिल्टरचे फायदे, मर्यादा तसेच प्रत्यक्ष प्रयोगांचे अहवालही यावेळी दाखविण्यात आले.
जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला हा फिल्टर भविष्यात कमी दरात सर्वसामान्यांसाठी कसा उपलब्ध करता येईल, याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे विदेशी संशोधकांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पामुळे निवी गाव व वाडीपाड्यांतील नागरिकांना आरोग्यदायी व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
