माथेरानमध्ये अश्‍वांचे लसीकरण

पालकमंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटनस्थळी वाहनांना बंदी असल्याने सर्व वाहतूक ही घोड्यावरून होते. त्या घोड्यांचे लसीकरण शासनाच्या लसीकरण पशु संवर्धन विभागाकडून केले जाते. शुक्रवारी पशु संवर्धन विभागाच्या वतीने घोड्यांचे लसीकरण आणि उपचार शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते माथेरानच्या दस्तुरी नाका येथे करण्यात आले.

त्यावेळी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले, कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली ठाकूर परदेशी, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, तहसिलदार विक्रम देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, माजी नगराध्यक्ष अजय सावंत आदी उपस्थित होते.

येथील पर्यटन विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी माथेरान या पर्यटनस्थळी येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे,यांच्या वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून घोड्यांचा उपयोग या ठिकाणी केला जातो. अश्‍वांचा वाहतुकीसाठी वापर करून येथील स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होतो.अशा अश्‍वांच्या आरोग्याची योग्य काळजी राखण्यासाठी त्यांना जंतूनाशक लसीकरण वेळेवर होणे गरजेचे असून त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नयेत यासाठी उपचार शिबिराचे आयोजन दरवर्षी करावे अशी सूचना केली.

Exit mobile version